Breaking News

पंकज देशमुख यांची बदली: न्यायाचा अपमान की भ्रष्टाचाराचं रक्षण?

 


पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईत पोलीस उपयुक्त म्हणून बदली करण्यात आली. मात्र, स्वतःच भ्रष्टाचार आणि गैरवर्तनात गुंतलेला अधिकारी, ज्याने पदाचा गैरवापर करून इतरांची करिअरं खेळवली, तोच आता आपल्या बदलीविरुद्ध कॅटमध्ये (केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरण) धाव घेतो, हे खरोखरच लज्जास्पद आहे. पंकज देशमुख यांनी या बदलीविरुद्ध कॅटमध्ये याचिका दाखल केली होती, आणि त्यांना पुढील सुनावणी होईपर्यंत बदलीला स्थगिती मिळाली आहे. मात्र, या स्थगितीमागचा खरा उद्देश काय? हा भ्रष्ट अधिकारी आपलं पुणे ग्रामीणचं पद सोडण्यास का तयार नाही?


देशमुख यांचा दावा आहे की, त्यांनी आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही, म्हणून त्यांची बदली बेकायदेशीर आहे. परंतु, याच देशमुखांनी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असताना काय केलं होतं? कितीतरी अधिकाऱ्यांच्या मुदतीआधीच बदली केल्या. तिथे कोणता न्याय आणि कोणती प्रक्रिया मान्य होती? त्या बदल्या त्यांच्या सोयीप्रमाणे, चिरीमिरी घेऊन केल्या जात होत्या. त्यांनी अधिकारीवर्गात गट तयार करून पक्षपातीपणाच्या आधारावर "क्रीम पोस्टिंग" वाटल्याच्या अनेक तक्रारी होत्या. हेच अधिकारी आज स्वतःची बदली क्रीम पोस्टिंग नसल्याने विरोध करत आहेत.

स्वतःचा स्वार्थ आणि पदाचा गैरवापर

मुंबईत पोलीस उपयुक्त म्हणून बदली ही काही छोटी बाब नाही. पण पंकज देशमुख यांची नाराजी यावरून दिसून येते की, त्यांना पुणे ग्रामीणसारख्या मालमत्तांच्या आणि प्रकल्पांच्या ठिकाणी असलेलं पद अधिक फायद्याचं वाटतं. मुंबईत मिळालेली बदली ही त्यांच्यासाठी क्रीम पोस्टिंग नसल्याचं त्यांचं वर्तन स्पष्ट करतं. अशा प्रकारचं भ्रष्ट वर्तन आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे.

धाराशिवमधील भ्रष्टाचार आणि बदल्यांचा खेळ

धाराशिवमध्ये कार्यरत असताना, देशमुख यांनी अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या करून त्यांना लाभ मिळवून दिले. मात्र, यामध्ये त्यांनी कायदेशीर पद्धतीने काम केलं का? नाही! ज्यांनी चिरीमिरी दिली, त्यांनाच क्रीम पोस्टिंग मिळालं. देशमुखांसाठी हा एक सत्ता वापरून आर्थिक लाभ घेण्याचा मार्ग ठरला होता. जे अधिकारी त्यांच्या या गैरवर्तनाचा विरोध करत होते, त्यांना त्रास दिला गेला, तर जे त्यांचे निकटवर्तीय होते त्यांना उच्च पदावर बसवण्यात आलं. याच पंकज देशमुख यांनी आज आपल्यावर न्यायाचा आघात झाल्याचा दावा करणं ही फक्त ढोंगबाजी आहे.

महाराष्ट्र शासनाची भूमिकाः

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने अशा मुजोर, भ्रष्ट आणि अप्रामाणिक अधिकार्‍यांना तात्काळ साईड पोस्टिंग दिली पाहिजे. पंकज देशमुख यांसारखे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असतील, तर त्यांना सार्वजनिक पदावर ठेवणं हीच मोठी चूक आहे. शासनाच्या हातात ही संधी आहे की, ते अशा अधिकार्‍यांना योग्य धडा शिकवून इतरांना उदाहरण ठरवतील. देशातील पोलीस व्यवस्थेचा पाया हा प्रामाणिकपणा आणि न्याय आहे, आणि ज्यांनी त्याचं उल्लंघन केलं आहे त्यांना शिक्षाच मिळाली पाहिजे.

न्यायप्रणालीची भूमिका:

कॅटने या प्रकरणात जो निर्णय घेतला आहे, तो विचारात घेण्याजोगा आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या अधिकारीाला तात्पुरती स्थगिती देणं हे कायदेशीर आहे का? अशा अधिकार्‍यांना न्यायाच्या ढोंगाखाली काम करण्याची मुभा दिली जाऊ नये. न्यायप्रणालीने याप्रकरणी कडक भूमिका घेतली पाहिजे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बाजूने न्यायाचा वापर होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

पंकज देशमुख यांची बदली हा फक्त एक प्रशासकीय निर्णय नसून, या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवर प्रकाश टाकणारी घटना आहे. भ्रष्ट अधिकारी, ज्यांनी इतरांना त्यांच्या सोयीने बदलवलं, आता स्वतःच्या बदलीला विरोध करत आहेत. शासन आणि न्यायालयाने कठोर भूमिका घेऊन अशा अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंग देऊन त्यांची सत्ता संपवली पाहिजे, अन्यथा भ्रष्टाचाराचा हा खेळ पुढेही सुरूच राहील.

- सुनील ढेपे, संपादक, पुणे लाइव्ह