मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावत्र भावांवर टीका; "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"
पुण्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे तीन हजार देऊ, अशी ग्वाही दिली.
सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. ते चुकीचे काहीतरी सांगून तुमची दिशाभूल करतील, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते पुण्यात बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी आम्ही योजना राबवत आहोत. आमचं सरकार फक्त देणारं आहे, घेणारं नाही. घर चालवताना माझी आई कशी कसरत करायची हे मी डोळ्यांनी पाहिले आहे. विरोधकांसह फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना आणि पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयांची किंमत कळणार नाही. माझ्या बहिणींना दीड हजारांची किंमत कळते. आता माझ्या बहिणींना यापुढे दर महिन्याला माहेरचा आहेर दीड हजार मिळत जाईल.
योजना अजिबात बंद होणार नाही
शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. गोरगरीबीतून संघर्षातून चटके खाऊन आम्ही समोर आलो आहोत. मी मुख्यमंत्री झालो होतो, त्यापेक्षा अधिक आनंद मला आज या योजनेच्या वितरणावेळी झालेला आहे. शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, देव मंदिरात नाही, माणसात असतो, असा मानणारा मी आहे. त्यामुळे बहिणींसाठी काहीतरी चांगलं करता आलं, याचा मला अभिमान आहे. माझ्या बहिणींना विनंती आहे की, कोणावरही विश्वास ठेवू नका, कोणी काहीही सांगेन, सावत्र भाऊ हल्ली चुकीचं सांगू लागले आहेत. ही योजना अजिबात बंद होणार नाही, वेळप्रसंगी आम्ही ही योजना अधिक जोमाने चालवू, त्यातील रक्कम पुन्हा वाढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सावत्र भावांना योग्य उत्तर द्या
अनेकांना मी आतापर्यंत पुरून उरलो आहे. सावत्र कपटी भावांवर मात करून आम्ही इथपर्यंत आलो आहोत. त्यांना केवळ लक्षात ठेवा, निवडणुकीत त्यांना योग्य उत्तर द्या. लाडकी बहीण योजनेत कशाप्रकारे खोडा घालता येईल, याचा प्रयत्न झाला. संधी मिळाली की सावत्र भावांना योग्य उत्तर द्या. लाडकी बहीण योजना सुरू करताना वर्षभराचे आर्थिक नियोजन करण्यात आले. आम्हाला रोज विरोधक शिव्या देत आहेत, आरोप करत आहेत, पण सर्वांच्या आशीर्वादाने सरकार केवळ टिकले नाही तर मजबूत झाले. तोंडाला फेस येईपर्यंत आम्ही फेसबुक लाईव्ह केले नाही. आमच्यावर टीका आम्ही सहन करू, पण बहिणींच्या आड कोणी आले तर आमचा नाद करू नका, असा इशारा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला.
विरोधकांकडून अडथळे
विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेत अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी प्रयत्न झाले, पोर्टल बंद पाडण्यासाठी जंक डेटा टाकला, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच, ही खटाखट नव्हे तर फटाफट अशी योजना आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींनाही टोला लगावला आहे. आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला, या सोहळ्यात फडणवीस बोलत होते.
पुण्याची निवड का?
या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड करण्यामागचे कारण फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. ते म्हणाले, ''आज खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींचा कार्यक्रम आहे. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. लाडक्या बहिणीची ही औपचारिक सुरुवात झाली आहे. याची सुरुवात पुण्यातूनच का झाली, यामागचे कारण म्हणजे जेव्हा परकीयांचे आक्रमण झाले तेव्हा जिजाऊंनी याच पुण्यात सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती. तसेच, महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला तेव्हा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच पुण्यातून शाळा सुरू केली. पुणे ही समाजकारणाची भूमी आहे. म्हणूनच आज या सोहळ्यासाठी पुण्याची निवड केली'', असे फडणवीस म्हणाले.
ही खटाखट नव्हे तर फटाफट योजना
फडणवीसांनी यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ''हे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही. पूर्वी वसुली करणारे सरकार होते, आता बहिणींना देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे आल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा निर्धार आहे. ही खटाखट नव्हे तर फटाफट योजना आहे'', असे फडणवीस म्हणाले.
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन...
पुढे ते म्हणाले, ''आमच्या घोषणेनंतर सावत्र भावांच्या पोटात खूप दुखलं. त्यांनी ही योजना बंद पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले. ते कोर्टात गेले. नंतर जाणीवपूर्वक फॉर्म भरून पुरुषांचे फोटो लावले. फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी प्रयत्न झाले. पोर्टल बंद पाडण्यासाठी पोर्टलवर जंक डेटा टाकला. त्यासाठी आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले. आम्ही दलालांचा धंदा बंद पाडला. थेट महिलांच्या खात्यात पैसे पोहोचवले. १५०० रुपयांवरून टीका केली जाते, मात्र सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांना १५०० रुपयांचे मोल कळणार नाही'', असे फडणवीस म्हणाले.
देशाच्या राजकारणात महिलाराज येणार
फडणवीस म्हणाले, महिलांना केंद्रस्थानी आणल्यावरच विकसित भारत होईल. म्हणून महिला केंद्रित योजना सुरू केल्या. महिलांना केंद्रस्थानी आणले तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. महाविकास आघाडीने मी सुरू केलेल्या सर्व योजना बंद केल्या. आताही ते योजना बंद करतील. एकही योजना चालू देणार नाहीत. आम्ही पाच वर्षांपर्यंत योजना सुरू ठेवण्याची व्यवस्था केली आहे. देशाच्या राजकारणात महिलाराज येणार आहे. कोणताही पुरुष त्यांना रोखू शकणार नाही. महायुती सरकार सुजलाम सुफलाम महाराष्ट्र तयार करणार आहे'', असे फडणवीस म्हणाले.