Breaking News

"बाबू'च्या आगमनाने मराठी चित्रपटसृष्टीत कोळी भाषेचा जलवा !

 




मुंबई: कोळी भाषेचा झणझणीतपणा आणि ९० च्या दशकातील मुंबईची झलक दाखवणारा 'बाबू' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ॲक्शन, प्रेम, सूड यांची गुंफण पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'बाबू'च्या आयुष्यातील अनेक पैलूंना उलगडणारा हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.


चित्रपटातील गाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'बाबू' हे टायटल सॉंग तर अनेकांच्या ओठांवर रुळले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या या गाण्याला नकाश अजीज यांचा आवाज आणि संतोष मुळेकर यांचे संगीत लाभले आहे. तर 'फ्युचर बायको' या गाण्यानेही अनेकांना भूतकाळात नेऊन सोडले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आणि ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत असलेले हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.


दिग्दर्शक मयूर शिंदे यांनी सांगितले की, "मराठीत प्रथमच कोळी भाषा अस्सलपणे वापरली गेली आहे. हा चित्रपट केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारा नसून, तरुणाईला त्या काळातील प्रेमाची अनुभूती देणारा आहे. प्रेम, मैत्री, बदला यासोबतच चित्रपटातील गाण्यांची विविधता प्रेक्षकांना नक्कीच भावेल."


श्री समर्थ कृपा प्रोडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटात अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव, सोमनाथ तडवळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुनीता बाबू भोईर यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.


बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश 'बाबू'’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील  प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.