भ्रष्ट पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदेचा पुण्यातही कारनामा सुरु
खंडणी प्रकरणातील आरोपीस अप्रत्यक्ष सहकार्य , आरोपी निघाला शिंदेचा व्याही !
पोलीस आयुक्तांकडून सक्त ताकीद, निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुणे - उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अनेक कारनामे करून पुण्यात दाखल झालेला भ्रष्ट पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे ( बंड गार्डन पोलीस स्टेशन ) याने पुण्यातही मोठा कारनामा केला आहे. खंडणी टोळीतील एका आरोपीस गोपनीय माहिती पाठवून अप्रत्यक्ष सहकार्य केले आहे. विशेष म्हणजे खंडणी टोळीतील एक आरोपी अण्णा दळवी - नाईकवाडी हा पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे याच्या मुलीचा सासरा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यानी त्याच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी फक्त 'सक्त ताकीद' ही शिक्षा दिली आहे,त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे टोळीने धुमाकूळ घातला आहे. पोलीसांनी रवींद्र बऱ्हाटेसह १३ जणांच्या टोळीविरुद्ध 'मोक्का' लागू केला आहे.त्यात रवींद्र बऱ्हाटेसह पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, बडतर्फ पोलिस परवेझ जमादार, विशाल ढोरे, विनोद ढोरे, सुजित सिंह, अस्लम पठाण, बालाजी लाखाडे, सचिन धिवार, विठ्ठल रेड्डी, गणेश आमंदे, नितीन रामदास पवार यांच्या नावांचा समावेश आहे. या खंडणी प्रकरणात आणखी एक नाव समोर आले आहे. अण्णा दळवी - नाईकवाडी असे या आरोपीचे नाव असून तो बंड गार्डन पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे याच्या मुलीचा सासरा आहे.
आरोपीस अप्रत्यक्ष सहकार्य
मुळशी तालुक्यातील सारोळे गावातील श्रीमती मानसी शिंदे यांनी, प्रकाश फाले, सविता फाले, अण्णा दळवी - नाईकवाडी , माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन आदीविरुद्ध ३० जुलै २०२० रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त ( लष्कर विभाग ) यांच्याकडे तक्रार दिली होती. डीसीपी यांनी हा तक्रार अर्ज पुढील चौकशीसाठी बंड गार्डन पोलीस स्टेशनला पाठवला होता.
हा अर्ज आल्यानंतर भ्रष्ट पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी आरोपीस सहकार्य केले. यातील मुख्य सूत्रधार अण्णा दळवी - नाईकवाडी हा पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे यांच्या मुलीचा सासरा आहे. त्याने दळवीला श्रीमती मानसी शिंदेचा तक्रार अर्ज एका पोलीस नाईकच्या व्हाट्स अँपवरून पाठवला. त्यामुळे आरोपी अलर्ट होवून वकिलांचा सल्ला घेऊ लागला.
पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या अर्जावर कारवाई करण्याऐवजी पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे याने व्याहीला अप्रत्यक्ष सहकार्य केले आणि गोपनीयेचा भंग करून बेजबाबदार आणि हलगर्जीपण केला. त्याची खातेनिहाय चौकशी सुरु झाली. चौकशीमध्ये अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या असताना, पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे यास फक्त 'सक्त ताकीद' ही किरकोळ शिक्षा देण्यात आली आहे.
भ्रष्ट पोलीस निरीक्षक दिगंबर भवानी शिंदे यास तात्त्काळ निलंबित करून आरोपीस अप्रत्यक्ष सहकार्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.