Breaking News

नगर : रेखा जरे - पाटील खून प्रकरणी तीन संशयित ताब्यात



नगर -  नगर जिल्ह्यात  सध्या गाजत  असलेल्या रेखा जरे - पाटील खून प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचे महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.  स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्यांच्या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस अधीक्षक आज दुपारी या संदर्भात पत्रकार परिषद घेणार असून पोलीस त्यामध्ये हत्येचं कारण आणि खरा सूत्रधार कोण याबाबत माहिती देतील अशी शक्यता आहे.


रेखा जरे - पाटील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या त्या पदाधिकारी होत्या. तथापि, अलिकडेच त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता. कार्यकर्त्या म्हणून त्या राष्ट्रवादीत सक्रीय होत्या. मराठा क्रांती मोर्चा आयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता.


रेखा जरे या सोमवारी त्यांचे चारचाकी वाहन घेऊन पुणे येथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या आई, मुलगा व महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने होत्या. पुणे येथून परत येत असताना जातेगाव घाटामध्ये यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. यानंतर त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. 


अटक केलेल्या तिघांमध्ये दोन कोल्हार येथील; तर एक केडगाव येथील आरोपी आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. परंतु रेखा जरे यांच्या हत्येचं नेमकं कारण काय हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतरच याचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.