Breaking News

दिव्यांच्या प्रकाशाने उजळले 'दगडूशेठ' गणपती मंदिर

 

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार दिव्यांनी सजले मंदिर




पुणे : श्री गणेशाला फळ-भाज्यांसह मिठाई, फराळाच्या तिखट-गोड निवडक पदार्थांचा अन्नकोट आणि सभामंडपात व मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने दगडूशेठ गणपती मंदिर उजळून निघाले. दरवर्षी मोठया प्रमाणात होणारा अन्नकोट यावर्षी साध्या पद्धतीने ठेवण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत ५१ हजार दिव्यांची केलेली सजावट लक्षवेधी ठरली. 



श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि साध्या पद्धतीने अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी देखील मंदिराचा परिसर सजविण्यात आला. कार्यक्रमाचे यंदा २२ वे वर्ष आहे. 



ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी मोठया प्रमाणात अन्नकोटाचे आयोजन केले जाते. भाविकांना केलेल्या आवाहनाद्वारे दरवर्षी तब्बल ५०० हून अधिक पदार्थ गोळा होतात. यंदा भाविकांना कोणतेही आवाहन न करता अत्यंत साध्यापद्धतीने ट्रस्टने दीपोत्सव व अन्नकोट साजरा केला आहे. आरोग्यसंपन्न जगाकरीता गणरायाला आम्ही साकडे घातले आहे. लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होऊन जनजीवन सुरळीत व प्रकाशमान व्हावे, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत.


Video