सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री ?
शरद पवार यांचे मोठं विधान
मुंबई - पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे असे म्हटले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यानंतर शेलार यांनी ते वक्तव्य राजकीय नसून पुस्तकातील संदर्भाशी निगडीत असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. “सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात आहे,” असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांचा संच मोठा आहे. या सर्वांतून मान्य असतील अशा अनेक लोकांची नावं घेता येतील. अजित पवार आहेत, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी अनेक नावं देता येतील जी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत,” असंही ते नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
काय म्हणाले होते आशिष शेलार?
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन झालं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगून सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फोडले होते.
दरम्यान, पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा विषय टोलवून लावला असला तरी राजकीय विश्लेषकांनी मात्र, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होऊ शकतील असा दावा केला आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. आजची विधानं उद्या कायम असतील असं नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाही राष्ट्रीय राजकारणातच रस होता. पण हायकमांडचे आदेश मिळाल्यानंतर ते राज्यात आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. त्यामुळे काय होईल हे आताच सांगता येणार नाही, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर, सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह चार दोन महिला राजकारण्यांची नावं कायमच मुख्यमंत्रीपदीसाठी चर्चेत असतात, त्यात काही नवीन नाही. तसेच राजकारणात उद्या काय घडेल हे आताच सांगणं शक्य नाही, असं राजकीय विश्लेषक आणि पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितलं.