रितु छाब्रिया यांना उल्लेखनीय समाजकार्याबद्दल 'प्रेसिडेंट अवॉर्ड फॉर बेस्ट फिलॉन्थ्रॉफी' पुरस्कार
पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संचालिका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया यांना 'प्रेसिडेंट अवॉर्ड फॉर बेस्ट फिलॉन्थ्रॉफी' पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून जागतिक स्तरावरील नामवंत संस्थांना सोबत घेऊन सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल रितू छाब्रिया यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार लंडन येथील ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स फ्रॉम इंडियन ओरिजीन (बीएपीआयओ) संस्थेच्या वतीने दिला जातो.
गेल्या २० वर्षांपासून छाब्रिया मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, सामाजिक विकास, जलसंवर्धन, शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वच्छता आदी क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेने विविध घटकांसाठी समाजोपयोगी कार्य करत आहेत. फाउंडेशनने २०१८ मध्ये 'एमएमएफ युके' नावाने लंडन धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी केली. त्यानंतर अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहचून त्यांना आनंदाने जगण्याची संधी देण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक नामवंत संस्थांना या कार्यात सोबत घेतले. त्यामध्ये डॉ. संजीव निचानी संचालित बालरोग तज्ज्ञांचा ग्रुप असलेल्या 'हीलिंग लील हार्ट्स'ने पुण्यात येऊन चार हार्ट सर्जरी शिबीर घेतले. त्यातून १०७ बालकांना लाभ झाला. 'रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थ'शी २०१७ पासून फाउंडेशन काम करत असून, सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त मुलांसाठी पुणे आणि सातारा येथे काम सुरु आहे. आजवर शेकडो सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांना आणि कुटुंबियांना आधार दिला आहे. 'युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स ऑफ लेइस्चर्स एनएचएस ट्रस्ट'मधील डॉ. दीपा पंजवानी यांच्या नेतृत्वातील टीमने पुण्यात भेट देऊन ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता विभागातील नर्सेसना प्रशिक्षण दिले. सोबतच सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगमधील विद्यार्थिनींना प्रशिक्षण सुरू आहे.
'युसीएल'च्या सहकार्यातून माता व बालक यांच्यासाठी कार्य सुरु आहे. डॉ. मिमिका लाखनपॉल बाळाचे, आईचे आरोग्य-आहार याबाबत मार्गदर्शन करतात. 'कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ' संस्थेच्या सहकार्यातून डॉ. गझला अफझल आणि त्यांची टीम पुण्यात मानसिक आरोग्य क्षेत्रातील मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात. आजपर्यंत पाच प्रशिक्षण शिबिरे झाली असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात याचा चांगला उपयोग झाला आहे. 'सपोर्ट टू एनएचएस', 'बर्नाडोस', 'अक्षयपात्र' या संस्थांच्या सहकार्याने कोरोनाच्या कठीण काळात अन्न पुरविण्यात आले. यासह अक्षयपात्र संस्थेच्या सहकार्याने लंडन येथील शालेय मुलांना पोषण आहार देण्यासाठी उपक्रम सुरु आहे. यासह अनेक नामवंत संस्थांशी सहकार्य करार करत जगभर समाजकार्याची कक्षा मुकुल माधव फाउंडेशनने विस्तारली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडितांना मदतकार्य, कोरोना महामारीच्या काळात गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, 'गिव्ह विथ डिग्निटी'सारखा उपक्रम देशभर राबवत मदतीचा हात दिला. जवळपास तीन लाख लोकांना याचा लाभ झाला.
रितु प्रकाश छाब्रिया प्रसिद्ध समाजसेविका असून, पुण्यासह महाराष्ट्र आणि देशभर उदात्त भावनेने समाजकार्य करत आहेत. वंचित घटकांतील लोकांना चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा पुरवून त्यांचे आयुष्य सुखी बनविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. 'लिव्ह टू गिव्ह' हा मंत्र तरुण वयातच आत्मसात करून त्या काम करत आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये संचालकपदी कार्यरत रितू छाब्रिया हिंदुजा फाउंडेशन, हिंदुजा हेल्थकेअर, सिम्बायोसिस इथिक्स कमिटी, आयएमसी मॅनेजिंग कमिटी मेंबर यासह अनेक बोर्ड व कमिटीवर कार्यरत आहेत. इतर स्वयंसेवी संस्थांप्रमाणे मुकुल माधव फाउंडेशन एखाद्या प्रकल्पाला एकवेळ देणगी देऊन थांबत नाही, तर त्या प्रकल्पाची देखरेख, आढावा आणि पाठपुरावा करून तो व्यवस्थित चालण्यासाठी प्रयत्न करते.
या सन्मानाबद्दल रितु छाब्रिया यांनी आनंद व्यक्त केला. भविष्यात आणखी जोमाने आणि भरीव सेवाकार्य कार्याचे असून, जास्तीत जास्त लोकांना सुखी-समाधानाचे जीवन जगता यावे, यासाठी प्रयत्नशील आहे. गरीब, गरजू लोकांना मदत करणे हेच मुकुल माधव फाउंडेशनचे प्रमुख कार्य आहे, ते अविरत सुरु राहील, असे रितू छाब्रिया यांनी नमूद केले.