Breaking News

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा



पुणे : राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष.... वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या पारंपरिक वेशातील महिला आणि शुभमंगल सावधान... चे मंगलाष्टकांचे सूर अशा पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशीविवाह सोहळा यंदा साधेपणाने पार पडला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुळशी चरणी नतमस्तक होत, आरोग्यसंपन्न समाजाचे मागणे मागत होती.


निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशीविवाह सोहळ्याचे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कार्यकर्ते व महिला, साखरे महाराज मठाचे विश्वस्त सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून उपस्थित होते. कार्यक्रमाचे यंदा ३८ वे वर्ष होते. 


ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. 


दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे साखरे महाराज मठात मूर्ती आणण्यात आली. मंदिराबाहेर मूर्तीचे पूजन व औक्षण करण्यात आले. रांगोळीच्या व फुलांच्या पायघडयांनी रस्ता सुशोभित करण्यात आला होता. मठात झालेल्या विवाहसोहळ्याला पुणेकरांनी पारंपरिक वेशात हजेरी लावली.