तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो - राज ठाकरे
पुणे - ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’ असा धीर देत राज ठाकरे यांनी मनसे उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देणाऱ्याला मनसे स्टाईल उत्तर देण्याचे ठरवले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे केली आहे.
त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करुन धीर दिला आहे. ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असं राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितलं.
राज ठाकरे यांच्या फोननंतर ‘ज्यांच्या डोक्यावर राज ठाकरे यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. अश्या धमक्यांना मनसे वाले भीक सुद्धा घालत नाही’ , अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे.