Breaking News

कोल्हापुरातील आणखी एका सुपुत्राला वीरमरण


पाकिस्तानच्या कुरापती सुरूच





कोल्हापूर  -शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले आहेत.शहीद जवान संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावातील रहिवाशी असून, अठरा वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये ते कार्यरत होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती.


गेल्या काही दिवसांपासून पाककडून सीमेवर कुरापती सुरू आहेत. भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिलं जात असून, शनिवारी सकाळी पाक लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधी धुडकावून लावत अंदाधुंद गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातील नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले.


यापूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. दिवाळीच्या दिवशीच त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे.



सैन्य सूत्रांकडून  मिळालेल्या माहितीनुसार, नापाक पाकची गोळीबार करण्याची ही मालिका आज पहाटे सुरु झाली. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांना लक्ष्य करत मोर्टारचे गोळे दागले. गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी हवालदार शेखर यांना शहीद घोषित केले. त्याचवेळी पाकिस्तानच्या या गोळीबाराला  भारतीय सैनिकही चोख प्रत्युत्तर दिले आहे.