Breaking News

बारामतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या

सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे  





बारामती -  सावकारांच्या जाचाला कंटाळून शहरातील एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली असून, सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांची नावे  उघड झाली आहेत. यावरून आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 


बारामती येथील व्यापारी प्रीतम शहा यांनी, राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्याकडून व्याजाने पैसे घेतले होते, पैसे परत करूनही या नेत्यांनी तगादा लावल्याने त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी नऊ जणांची  नावे  लिहिली आहेत. 


व्यापारी प्रीतम शहा यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणात  ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. नगरसेवक जयसिंह अशोक देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी उर्फ सुनील आवळे, संघर्ष गव्हाले, मंगेश आमसे यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. यातील एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत, बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेचे संचालकांचा समावेश आहे.पोलिसांनी ९ पैकी सहा जणांना अटक केली आहे. 


या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जो निकष लावून अर्णब  गोस्वामी यांना  अटक केली, तोच निकष लावून राष्ट्रवादीच्या नेत्यांना अटक करणार का ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 


राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही- महेश तपासे 

बारामतीतील व्यापाऱ्याने आत्महत्या करताना लिहिलेल्या नोटमध्ये नामोल्लेख असलेल्या लोकांचा राष्ट्रवादीशी काडीमात्र संबंध नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे. 

बारामतीतील व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर भाजपकडून आत्महत्या प्रकरणात आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा आरोप केला होता त्याला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलेच शिवाय त्या लोकांचा राष्ट्रवादीशी संबंध नाही हेही स्पष्ट केले आहे. 

जयसिंह देशमुख हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. तो राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आलेला नगरसेवक आहे. उर्वरित नावे आहेत त्यात संघर्ष गव्हाले हा भाजपाचे स्थानिक नेते विजय गव्हाले यांचा मुलगा आहे त्यामुळे यांचा राष्ट्रवादीशी संबंध जोडू नये आणि राष्ट्रवादीची बदनामी करु नये असेही महेश तपासे यांनी भाजपाला ठणकावून सांगितले आहे.



अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा खोटा धंदा ताबडतोब बंद करावा. कारण नसताना बेजबाबदारपणे राष्ट्रवादीची बदनामी करु नये असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.