Breaking News

मेट्रो, रिंगरोडला गती द्या : चंद्रकांत पाटील

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी "मेट्रो', "रिंगरोड' आणि "हायपर लूप'सारखे प्रकल्प गतीने मार्गी लावावेत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी पीएमआरडीने हाती घेतलेल्या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी पीएमआरडीएच्या प्रकल्पांची माहिती दिली.

पुणे महानगर क्षेत्राचा शाश्‍वत विकासाचे नियोजन पीएमआरडीएने केले आहे. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा या माध्यमातून भर देण्यात येत आहे, असे सांगून पाटील म्हणाले, "मेट्रो', "रिंगरोड', "नगररचना योजना' यांसाख्या प्रकल्पांमुळे महानगराच्या विकासाचा वेग वाढणार आहे. पुणे- मुंबईमधील प्रवासी अंतर कमी करण्यासाठी "हायपर लूप' हा प्रकल्प हाती घेतला आहे. या सर्व प्रकल्पांची कामे विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्‍यक आहे.''

या वेळी पालकमंत्री पाटील यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत आढावा घेतला. नवनगर उभारणीसाठी भूसंपादन, संपादित जमिनीचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकास आदी विषयांवर त्यांनी चर्चा केली.