पाणीपुरवठा समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष!
माजी सैनिकांची तक्रार धूळ खात
कार्निव्हल हॉटेलसमोरील सैनिक कॉलनीत माजी सैनिकांची एकूण २८ घरे असून, केवळ अर्ध्या घरांना नियमित पाणीपुरवठा होत आहे. बाकी घरांना पाणी मिळत नसल्यामुळे ते विकत पाणी खरेदी करायला भाग पाडले जात आहेत. विशेष म्हणजे कॉलनीतील एका भागात मोठ्या व्यासाचा पाईप असून तेथे नियमित पाणीपुरवठा होत आहे, तर उर्वरित घरांमध्ये लहान व्यासाच्या पाईपमुळे पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो.
कॉलनीच्या सुरुवातीच्या घरांमध्ये विद्युत मोटारी लावल्यामुळे शेवटच्या घरांना पाणी पोहोचतच नाही. या समस्येमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार देऊन १५ दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठ्या व्यासाचे पाईप बसवावेत आणि पाणीपुरवठ्याचा दाब वाढवण्यासाठी सुधारणा कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
पाणीपुरवठा हा मुलभूत हक्क असून देखील महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त आहेत. "आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल," असा इशारा माजी सैनिक दामू जयवंत लोखंडे यांनी दिला आहे.