Breaking News

पुण्यात बनावट जामीनदार व वकिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश; 2 वकिलांसह 11 जणांना अटक

 


पुणे: न्यायालयाची दिशाभूल करून गुन्हेगारांना जामीन मिळवून देणाऱ्या बनावट जामीनदार आणि वकिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात दोन वकिलांसह ११ जणांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये कोर्टातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघडकीस आला आहे.

अटक केलेले वकिल व प्रमुख आरोपी

अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे अ‍ॅड. असलम गफुर सय्यद (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) आणि अ‍ॅड. योगेश सुरेश जाधव (वय ४३, रा. हडपसर) अशी आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार फरहान ऊर्फ बबलू शेख असून, त्याने काही वकिलांच्या मदतीने बनावट जामीनदार उभे करून मोठ्या रकमेच्या मोबदल्यात गुन्हेगारांना जामीन मिळवून दिल्याचे उघड झाले आहे.

गुन्ह्याची उकल कशी झाली?

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी लष्कर कोर्ट आवारात सापळा रचण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी संतोषकुमार शंकर तेलंग यासह ५ बनावट जामीनदारांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी फरहान शेख हा पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांवर कारवाई करत पुढील चौकशी सुरू ठेवण्यात आली.

बनावट कागदपत्रांची मोठी जाळे

तपासादरम्यान ९५ बनावट रेशनकार्ड, ११ आधार कार्ड, तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपी हे न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी खोट्या नावाने आधार कार्ड, रेशन कार्ड आणि ७/१२ उताऱ्यात फेरफार करून जामीनदार उभे करत होते. रेशनकार्ड खरे वाटावे यासाठी तेवर बनावट सरकारी शिक्के आणि सही लावली जात होती.

बनावट शिक्के आणि बनावट कागदपत्रे बनवणारे अटकेत

मुख्य आरोपी फरहान शेखला बनावट शिक्के आणि कागदपत्रे बनवून देणाऱ्या दर्शन अशोक शहा (वय ४५, रा. सोलापूर बाजार, कॅम्प) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ९ रबरी शिक्के आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचे यंत्र जप्त करण्यात आले आहे. याशिवाय पिराजी ऊर्फ चंद्रकांत शिंदे (वय ६०, रा. मोशी) आणि गोपाळ कांगणे (वय ३५, रा. पिंपरी) यांनाही अटक करण्यात आली आहे.

कोर्टातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग

या रॅकेटच्या तपासात न्यायालयातील काही वकिलांसह कोर्टातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग आढळून आला आहे. बनावट कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांना हाताशी धरले जात होते.

पुढील तपास सुरू

या संपूर्ण प्रकरणाचा तपास वानवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनाजी टाणे करत असून, यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुण्यात अशाप्रकारे बनावट जामीन मिळवून देणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी मोठी कारवाई करून गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे.