एसएमएम सोसायटीतील रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी आयुक्तांकडे मागणी
पुणे : बी. टी. कवडे रोडवरील एसएमएम सोसायटीतील रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दिवाळीपूर्वी खोदण्यात आलेल्या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. सोसायटीतील रहिवाशांनी यासंदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
एसएमएम सोसायटीतील सुमारे अर्धा किलोमीटर रस्ता सिमेंटचा होता. दिवाळीपूर्वी, या रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करून ड्रेनेज लाईन बदलण्यात आली. एक महिना उलटून गेला, तरी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेला रस्ता अजून सिमेंटचा करण्यात आलेला नाही. सध्या, रस्त्यावर फक्त खडी अंथरलेली आहे आणि केवळ ५० मीटर रस्ता सिमेंटचा करून काम बंद ठेवण्यात आले आहे.
यामुळे, या भागातील रहिवाशांना रस्त्यावरून चालताना तसेच दुचाकी वाहने चालवताना खूप अडचणी येत आहेत. चारचाकी गाड्या जाणे तर अत्यंत अवघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रहिवाशांना त्यांच्या चारचाकी गाड्या दुसरीकडे पार्क कराव्या लागत आहेत. रस्त्याची सध्याची स्थिती दर्शवण्यासाठी सोसायटीतील सदस्यांनी काही फोटो देखील जोडले आहेत. तसेच, रस्त्याचे काम अत्यंत स्थातूरमातुर होत असून, त्याची चौकशी करण्याची मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.