Breaking News

बीड मस्साजोग हत्याकांड: वाल्मीक कराड सीआयडीपुढे शरण

 



पुणे: बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड आज अखेर सीआयडीपुढे शरण आला आहे. त्याने पुणे स्थित सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले.

वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

मंगळवारी सकाळी एका व्हिडिओद्वारे कराड याने आपण पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर करणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्याविरोधात बीडच्या केज पोलिस ठाण्यात खंडणीची खोटी फिर्याद दाखल असल्याचे त्याने व्हिडिओत म्हटले आहे.

"मला अटकपूर्व जामीनाचा अधिकार असताना मी पुणे सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे मारेकरी जे कुणी असतील त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली जावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे," असे कराड म्हणाला.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मीक कराड आज सरेंडर करणार असल्याचा दावा केला होता.