इंदापूरात तुतारी वाजली, पण घड्याळ तितक्याच वेळेवर टिक-टिक !
इंदापूरच्या राजकारणात सध्या एक नवा वळण आलं आहे. माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी, निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा निरोप घेतला आणि "रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी" म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. पण इथल्या राजकीय नाट्यात नेमकं काय चाललंय? पाटील साहेबांची ही ‘तुतारी’ खरोखर वाजेल का, की दत्तात्रय भरणेंचं ‘घड्याळ’ पुन्हा एकदा वेळेवर टिक-टिक करणार?
चार वेळा आमदार, पण दोन वेळा हारले!
हर्षवर्धन पाटील यांनी १९९५ पासून इंदापूर मतदारसंघात जणू आपला गड बनवला होता. सलग चार वेळा निवडणुका जिंकून त्यांनी राजकारणात चांगलीच पकड मिळवली होती. ते काँग्रेसचे जुने शिलेदार, मंत्रीपदही मिळवले होते. पण सगळं काही नेहमीसारखं राहिलं असतं तर राजकारण काय चवदार लागलं असतं?
२०१४ मध्ये दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरत पाटील साहेबांचा पराभव केला आणि इंदापूरच्या मैदानात नवा खेळ सुरू झाला. या धक्क्याने काँग्रेसचा जोर ओसरला आणि पाटील साहेब थेट भाजपच्या छावणीत दाखल झाले. २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवली, पण घड्याळाने पुन्हा आपली वक्तशीरता सिद्ध करत त्यांना आणखी एक धक्का दिला.
महायुतीत फसले पाटील साहेब
आता २०२४च्या निवडणुकांचे ढोल वाजायला लागलेत. पाटील साहेबही पुन्हा इंदापूरच्या राजकीय मैदानात उतरण्यासाठी तयार होते, पण अडचण अशी की महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला सुटली! यामुळे पाटील साहेबांची खेळीच गडबडली. "माझं काय होणार?" असं म्हणत पाटील साहेबांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
तुतारीच्या ऐवजी घड्याळाची टिकटिक ?
आता पाटील साहेब राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात दाखल झाले असले तरी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काय होईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पाटील साहेबांनी तुतारी वाजवली खरी, पण ही तुतारी वाजणार की पुन्हा एकदा भरणे साहेबांचं घड्याळ बरोबर वेळ दाखवणार, हे इंदापूरच्या जनतेलाच ठरवायचंय.
राजकीय कसरती, पक्षबदल, आणि निवडणुकीच्या ताणात, पाटील साहेबांची राजकीय तुतारी इंदापूरच्या मतदारांना भुरळ घालेल का, की भरणे मामा पुन्हा त्यांना धोबीपछाड देणार? ही लढाई खऱ्या अर्थाने रोचक ठरणार आहे.