Breaking News

पुणे हादरले ! महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला पेटविण्याचा प्रयत्न



पुणे - रस्त्यात थांबविल्याच्या कारणावरून वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात मध्यवस्तीत बुधवार चौकात शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम १०९ आणि १३२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संजय फकीरा साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पोलिस वाहतूक नियमन करत होते. या वेळी पोलिसांनी संशयावरून एका वाहनचालकाला थांबविल्यानंतर त्याने पोलिसांसोबत वादावादी केली. त्यानंतर एकाने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकले. परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले. महिला पोलीस कर्मचारी म्हणाली कि, “आमच्या अंगावर पेट्रोल टाकल्यानंतर उलटे धरल्यामुळे आमचा जीव वाचला. आमचा पुनर्जन्मच झाला आहे. या धक्क्यातून सावरायला वेळ लागला. एक तासभर तरी मला बोलता आले नाही”

विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फरासखाना वाहतूक कार्यलय समोर शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. संशयिताने लायटर उलटे धरल्याने ते पेटू शकले नाही आणि अनर्थ टळला.मद्यपान करून वाहन चालविण्याविरुद्ध पुणे शहरात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ही घटना घडली. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

वाहनांची तपासणी आणि गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येत आहे. विश्रामबागमध्ये अशाच एका कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी एका मद्यधुंद चालकाला तपासणीसाठी रस्त्यावर थांबवले. यावेळी संबधित चालक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात चालकाने अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि लायटरने त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लायटर चुकीच्या पध्दतीने धरल्याने तो पेटला गेला नाही, त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी त्वरीत चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस पुढील तपास करत आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई रात्रीच्या वेळेस पोलिसांकडून कडक करण्यात आल्याने ठिकठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिसांचा बंदोबस्त सध्या दिसून येत आहे.

कठोर कारवाईचे आदेश द्या- सुप्रिया सुळे

पुण्यात एका महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले आहे. पोलीसांवर हात टाकेपर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत. गृहमंत्री महोदय ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे असे त्या म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांचे ट्विट नेमके काय?

सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ''राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्ह ची कारवाई सुरु असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. थेट पोलीसांवर हात टाके पर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत'', असा हल्ला त्यांनी चढवला आहे.