Breaking News

माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनोखी मानवंदना

गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन


पुणे : ज्ञानोबा माऊली तुकाराम... माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.


कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी यांसह श्रीमंत उर्जीतसिंह शितोळे (सरकार), महादजी राजे शितोळे (सरकार), युवराज विहानराजे शितोळे (सरकार) यांसह पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होती.

 

शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. आता दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.

 

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत हरित वारी, स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.