Breaking News

कोरोनाची लस उशिरा चालेल; पण सुरक्षित हवीव - डॉ. अविनाश भोंडवे



पुणे : "कोरोनाची लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात लस येण्यासाठी दोन-तीन महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. कारण, परिणामकारक लस मिळण्यासाठी विविध टप्प्यातून जावे लागते. ही लस ठराविक तापमानात साठवावी लागते. आज आपल्याकडे लस साठवण्यासाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे लस उशिरा आली तरी चालेल पण ती सुरक्षित यायला हवी. लस आणण्यात होत असलेली घाई अयोग्य आहे," असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले. आरोग्याकडे सखोलपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.


कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवाकार्य करणाऱ्या वैद्यकीय, पोलिस, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक अरुण खोरे, 'वनराई'चे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते. 


आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने, औंध जिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन चप्पलवार, पत्रकार सागर आव्हाड, सचिन सुंबे, सुमित आंबेकर, शेख अस्लम, नरहरी कोलगाने, ओपन लायब्ररी चळवळच्या अध्यक्षा प्रियांका चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल काळे, प्रमिला लोहकरे, क्रांतीकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव, ऍड. वाजेद खान यांच्यासह कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचा-यांच्या कुटुंबियाचाही सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते.


डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होण्यासाठी १३० कोटी लोकसंख्येपैकी किमान ९१ कोटी लोकांना लस देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, मास्क वापरणे, हात धुणे यावर भर देणे गरजेचे आहे. भारतात वैद्यकीय साक्षरता खूप कमी आहे. शिक्षण हे केवळ परीक्षेपर्यंत मर्यादित राहिले आहे. जीवन शिक्षण घेणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या मनात रुजायला हवा." 


अरुण खोरे म्हणाले, "समाजकार्याचा मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांचा वारसा कोरोना काळात अनेकांनी जपला. गांधीजींनी जशी कुष्ठरोगी परचुरे शास्त्री यांची सेवा केली, तसाच सेवाभाव या काळात पाहायला मिळाला. मानवतेचा, करुणेचा बिंदू डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी निस्वार्थ सेवा केली."


रवींद्र धारिया म्हणाले, "मानवसेवा ही ईश्वरसेवा आहे. धर्म, जातीभेद विसरून लोकांनी या काळात समाजसेवा केली. गरजूंना, वंचितांना मदतीचा हात वनराईसह इतर अनेक संस्थांनी, व्यक्तींनी दिला. दुष्काळग्रस्त भागात वनराईचे काम सुरू असून, तेथील लोकांमध्ये सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा आमचा प्रयत्न आहे."


गणेश चप्पलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. विजय गायकवाड यांनी आभार मानले


जनजागृती आवश्यक : डॉ. भोंडवे

जानेवारीला पहिला रुग्ण सापडूनही मार्चपर्यंत सरकारकडून हालचाल झाली नाही. प्रतिबंधक उपाय आम्ही पत्रक काढून पाठवले होते. अनेक शहरात त्याचे बॅनर्स लावले गेले. जनजागृती करण्याचे मोठे काम 'आयएमए'ने केले. नागरिकांच्या मनातील प्रश्न सोडविण्यासाठी माध्यमांनी चांगली भूमिका बजावली. सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याने संसर्ग वाढत गेला. परदेशातून आलेल्या लोकांना योग्य रीतीने विलगिकरण केले असते, तर त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असते.