मुस्लिम राष्ट्रीय मंच कडून 'पाकिस्तान को चेतावनी' अभियान
पुणे :पाकव्याप्त भारतीय भूभाग परत घेण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आणि पाकिस्तानला इशारा देण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच कडून 'पाकिस्तान को चेतावनी' अभियानाची घोषणा करण्यात आली असून डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी त्याचा प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती मुस्लिम राष्ट्रीय मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक अली दारूवाला यांनी पुण्यात पत्रकाद्वारे दिली.
हे अभियान महिनाभर चालणार असून पत्रकार परिषदा,धरणे आंदोलन,मोर्चा,निदर्शने देशभर आयोजित केली जात आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या राष्ट्रीय वेबिनार मध्ये या अभियानाची घोषणा करण्यात आली. या वेबिनार मध्ये सरसंघचालक मोहन भागवत,राम लाल,इंद्रेशकुमार या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. फारूक अब्दूल्ला, मेहबुबा मुफ्ती यांनी भारताविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा या अभियानात निषेध केला जाणार आहे.
पाकव्याप्त काश्मीर,गिलगीट,बाल्टीस्तान हा प्रदेश १९४७ पासून पाकच्या ताब्यात आहे. तो परत भारतात आणण्याचा निर्धार या वेबिनार मध्ये करण्यात आला.काश्मीर मधील नेत्यांच्या भारत विरोधी वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. चीन सारख्या शत्रूची मदत घेण्याची मनीषा या नेत्यांची असून ती मनीषा कधीही पूर्ण होवू दिली जाणार नाही,असे या वेबिनार मध्ये इंद्रेशकुमार यांनी सांगितल्याची माहिती अली दारूवाला यांनी या पत्रकात दिली.'मजबूत हम ,मजबूत भारत' या आधीच्या अभियानाचा आढावा या वेळी घेण्यात आला.राम मंदिर उभारणीसाठी मंच सर्वतोपरी मदत करणार असून त्यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यात येत असल्याचे इंद्रेश्कुमार यांनी या वेबिनार मध्ये सांगितले.