मनसेच्या ऍड. रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड
पुणे - पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसे उमेदवार ऍड. रुपाली पाटील -ठोंबरे यांना धमकी देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एका इसमास पोलिसांनी अटक केली आहे.
मोहन अंबादास शितोळे ( वय ५१, रा. मेंढा, जि. सातारा ) असे या इसमाचे नाव आहे. ऍड. रुपाली पाटील -ठोंबरे यांना या इसमाने आमदार होण्याचा प्रयत्न करू नको, पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू अशी धमकी देवून अश्लील शिवीगाळ केली होती.
या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस धमकी देणाऱ्या इसमाचा शोध घेत होते. आरोपी मोहन अंबादास शितोळे हा मेंढा येथे राहतो. तो स्वतःला देवऋषी म्हणून घेतो.
तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो - राज ठाकरे
मनसे उमेदवार ऍड. रुपाली पाटील -ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करुन धीर दिला होता. . ‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असं राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितलं होतं .
आरोपीस अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई कारवाई, अशी मागणी मनसे कार्यकर्ते करीत आहेत.