ब्राह्मण समाजाने अधिकाधिक मतदान करावे
जनजागृतीसाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : येत्या १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ब्राह्मण समाजाने अधिकाधिक मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले. ब्राह्मण समाजातील सुक्षितित मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करून योग्य उमेदवारांना निवडून द्यावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे (कॉल सेंटर) उद्घाटन स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी नगरसेवक योगेश समेळ, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आनंद दवे, विश्वस्त मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, रसिका घाणेकर, महिला आघाडी शहराध्यक्ष नीता जोशी, तृप्ती तारे, मिलिंद बर्वे, हर्षद ठकार आदी उपस्थित होते.
हेमंत रासने म्हणाले, "सुशिक्षित मतदारांनी आळस झटकून मतदान केले पाहिजे. ही पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक असून, त्यात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवार कोणा एका जिल्ह्याचा नाही, तर मतदारसंघाचा असतो. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल, त्या उमेदवाराला मतदान करून आपला हक्क बजवावा."
आनंद दवे म्हणाले, "मतदारांनी कोणाला मतदान करायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. पण ब्राह्मण समाजातील मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे. जास्तीतजास्त मतदान झाले, तर चांगले उमेदवार निवडून येतील." पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदानादिवशी सुटीवर न जाता मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जागृती करण्यात येणार असल्याचेही दवे यांनी सांगितले. योगेश समेळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
पेशव्यांच्या पुतळ्याला लोखंडी जिना करणार
शनिवारवाडा येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला स्वखर्चाने लोखंडी जिना करण्याची तयारी ब्राह्मण महासंघाने केली असून, त्या जिन्याच्या कामासाठी पुणे महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रासने यांच्याकडे केली. त्याला प्रतिसाद देत रासने यांनी पुढील दोन महिन्यात हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.