Breaking News

पुणे पदवीधरसह सर्व जागा जिंकू

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास


 



पुणे - भारतीय जनता पार्टीला विजयाचा इतिहास असून, आगामी विधान परिषद निवडणुकीत पुणे पदवीधरसह सर्व मतदारसंघाच्या निवडणुका जिंकू, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष  आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आज पुण्यातील आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर खासदार गिरीश बापट, रणजितसिंह नाईक निंबाळकर, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, माजी मंत्री सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, आ. मुक्ताताई टिळक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, महेश लांडगे, जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर, भीमराव तापकीर, राजेश पांडे, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


. आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, "2008 साली पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातून मी आणि भगवानराव साळुंखे निवडून आलो. त्यानंतरच्या निवडणुकीत ही भारतीय जनता पार्टीने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवला. तर 2014 साली भाजपाचे सरकार राज्यात आणि केंद्रात आलं. यानंतर पश्र्चिम महाराष्ट्राचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बालेकिल्ले ढासळू लागल्याने दोन्ही कॉंग्रेसला याची जाणीव झाली. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीने लढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण भाजपाला विजयचा इतिहास आहे. त्याचा लाभ आगामी निवडणुकीत पक्षाला नक्कीच होईल. त्यामुळे पुणे पदवीधर सह राज्यातील इतर जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा जसा शिस्तप्रिय आहे. तसाच तो नेत्याची आज्ञा शिरोधार्य मानून काम करत असतो. त्यामुळे मा. दादांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केवळ पुणेच नाही, तर इतरही मतदारसंघातून विजयी होतील. त्यामुळे बिहारप्रमाणे भाजपाची विजयी घोडदौड सुरूच राहिल.


पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले की, आजपर्यंत पदवीधर मतदारसंघाचे अनेक दिग्गजांनी नेतृत्व करताना पदवीधरांची चळवळ पुढे नेली. मा. दादांनी पुणे पदवीधर हा मतदारसंघ अक्षरशः तळहाताच्या फोडासारखा जपला. मी देखील असेच काम करेन. अन् या मतदारसंघाकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करणार नाही, असे काम करुन दाखवेन, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.


दरम्यान या कार्यक्रमावेळी पुणे शहरातील विविध क्रीडा संघटनांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना आपला पाठिंबा जाहीर केला. तर सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित थिटे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.  आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.