Breaking News

गुणवत्तापूरक शिक्षणाचा अधिकार ही संकल्पना महत्त्वाची – आदित्य ठाकरे

- शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले अमनोरा टाऊनशिप मधील छत्रभूज नरसी शाळेचे भूमिपूजन


पुणे - प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार आहे, मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार असावा या संकल्पनेवर काम करणे महत्त्वाचे आहे. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न पाहत असताना केवळ रट्टा मारत पूर्ण केलेले शिक्षण नव्हे तर मुलांमधील उत्सुकतेला योग्य मार्ग उपलब्ध करून देत त्यांच्या नवसंकल्पनांना व्यासपीठ देणे आम्ही गरजेचे मानतो. भविष्यात अशीच शिक्षण व्यवस्था उभारण्यावर आमचा भर असणार आहे, असे मत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडले.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक व खासदार शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हडपसर येथील अमनोरा टाऊनशिप मधील छत्रभूज नरसी या आयबी व केंब्रिज पॅटर्न असलेल्या शाळेचे भूमिपूजन आज पार पडले. या वेळी ठाकरे बोलत होते. अमनोरा सिटी कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, नरसी मोनजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त जयराज ठक्कर, हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.


या वेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “शाळा या नेहमीच आशेचा किरण म्हणून समोर आल्या आहेत. सध्याच्या कोविड १९ च्या या आव्हानात्मक काळात मागील ८ महिन्यानंतर मी कोविड सेंटर सोडून कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीच्या उद्घाटनाला आलो आहे. व्यक्तीगत माझ्यासाठी ही आशादाय बाब असून भविष्यात ही आशा कायम राहील असा माझा विश्वास आहे.”


आपला वैदिक धर्म हा पंचमहाभूतांची पूजा करतो, याचेच प्रतिक म्हणून अमनोरा टाऊनशिपमध्ये उभारलेल्या पर्यावरण मंदिराला भेट देण्याचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता, असेही ठाकरे यांनी आवर्जून नमूद केले.


या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “कोविड १९ नंतर आता नजीकच्या भविष्यात शाळांमध्ये असणा-या सोयी सुविधांमध्ये काही प्रमाणात बदल होणार आहेत हे गृहीत धरून आपण सर्वांनीच तयार रहायला हवे. यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे देखील गरजेचे आहे.” छत्रभूज नरसी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या शाळेचे उभारणी होत असताना त्यांचे स्मरण करायला हवे. व्यवसायात आलेल्या यशाचा उपयोग स्वत:साठी न करता त्यांनी आपल्या संपत्ती समाजासाठी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी वापरली ही मोठी बाब आहे, असेही पवार म्हणाले.


या वेळी बोलताना चेतन तुपे म्हणाले, हडपसर हा पूर्व पुण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या पद्धतीने पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्याच प्रमाणे आता हडपसर देखील शिक्षणाचे एक नवे हब म्हणून उदयास येत आहे, याचा मला अभिमान आहे.  


पुण्यातील सिटी कॉर्पोरेशन लि. आणि मेथीबाई देवराज गुंदेचा फाउंडेशन यांच्या वतीने हडपसर येथील अमनोरा टाऊनशीप येथे छत्रभूज नरसी शाळा सुरू करण्यात येत आहे. अमनोरा टाऊनशीपमध्ये तब्बल ३ लाख स्केअर फूट इतक्या जागेत बांधण्यात येत असलेल्या या शाळेतील एकूण ४.१ एकर क्षेत्र हे शाळेसाठी तर २.३३ एकर क्षेत्र हे केवळ खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध असणार आहे. सदर शाळेतील अभ्यासक्रम हा आयबी व केंब्रिज पॅटर्न नुसार असणार असून शाळा नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंत असणार आहे. जागतिक दर्जाच्या शिक्षण पॅटर्न सोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वर्ग,  प्रयोगशाळा, खेळाची व्यवस्था, डे केअर सेंटर, संगीत व नृत्य स्टुडिओ हे शाळेचे वैशिष्ट्य आहे. जून २०२२ मध्ये शाळा कार्यरत होणार असून सप्टेंबर २०२१ पासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे.