Breaking News

आमदार भारत भालके यांचं निधन, पंढरपुरावर शोककळा




पुणे - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचं करोनामुळे निधन झालं.पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.



भारत भालके यांना कोविड-19 झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली.  उपचार सुरू असताना भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (27 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं.त्यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे

बेधडक  भालके

2009, 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केली होती. पंढरपूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांना पराभूत करणारे जायंट किलर होते भारत भालके. 


भारत भालके यांचा थेट जनतेशी संपर्क होता. स्वभावानं बेधडक असलेल्या भालके यांच्याशी कार्यकर्त्यांचाही थेट संपर्क असायचा. जनतेशी दांडगा संपर्क असल्यानंच सलग तीन वेळा ते विधानसभेत पोहोचले होते. २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि पंढरपूर – मंगळवेढा हा नवीन मतदारसंघ तयार झाला.


याच मतदारसंघातून भालके यांनी २००९ मध्ये रिडालोसकडून निवडणूक लढवत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ अशी ओळख बनवली होती. २०१४ मध्ये पंढरपुरात प्रशांत परिचारक यांचा त्यांनी पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आणि जेष्ठ आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा पराभव करत आमदारकीची हॅट्ट्रिक केली होती.