Breaking News

डॉलर कमकुवत झाल्याने सोने व बेस मेटलला आधार


मुंबई, २० ऑक्टोबर २०२०: अमेरिकेतील डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने स्पॉट गोल्ड आणि बेस मेटलच्या दरात वृद्धी दिसून आली. चीनमधील वाढीव आर्थिक कामकाजामुळे औद्योगिक धातूंना आधार मिळाला. तर तेल उत्पादनात वृद्धी आणि साथीच्या आजाराचा विस्तृत परिणाम यामुळे कच्च्या तेलाचे दर काहीसे घसरले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने स्पॉट गोल्डचे दर ०.२८% नी उंचावले व ते १,९०४.३ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. इतर चलनधारकांसाठी पिवळा धातू स्वस्त झाला. अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नँसी पेलोसी यांनी आगामी अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी नव्या कोरोना मदत निधीबाबत आशा कायम ठेवल्याने डॉलरचे मूल्य कमकुवत ठरले.

सोने हे महागाई आणि चलन अवमूल्यन रोखण्यासाठी महत्त्वाचे साधन मानले जाते. कमी व्याजदरामुळे सोन्याने २०२० मध्ये २५% वृद्धी घेतली. जागतिक मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणावर तरलतेत प्रोत्साहन दिल्याने ही वाढ दिसून आली. यासोबतच, युरोपमध्ये कोरोना साथीमुळे पुन्हा निर्बंध लादले जात असून कोरोनाची जागतिक रुग्णसंख्या ४० दशलक्षपर्यंत गेल्याने सुरक्षित मालमत्ता समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे गुंतवणुकदारांचा कल दिसून आला.

कच्चे तेल: कोरोना आजाराचा प्रसार वाढतच असल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर काहीसे कमी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी कमी होत ४०.८ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. लिबियन तेल उत्पादनात वाढ झाल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले. अनेक युरोपियन सरकारांनी विषाणूच्या धोकादायक प्रसारामुळे पुन्हा निर्बंध लादले. यामुळे तेलाच्या जागतिक मागणीत घट होऊन दरांमध्येही आणखी घसरण दिसून आली. तथापि, अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीच्या कराराच्या शक्यतेमुळे तेलाच्या दर घसरणीवर मर्यादा आल्या.

विदेशातील मागणी वाढल्याने सौदी अरेबियाच्या तेल निर्यातीत गेल्या काही महिन्यात वृद्धी दिसून आली. ऑगस्ट २०२० मध्ये तेलाची निर्यात दररोज ५.९७ दशलक्ष बॅरल एवढी नोंदली गेली. दरम्यान, विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे कच्च्या तेलाच्या अर्थकारणावर आणखी परिणाम होऊ शकतो. तेलाचे दर आणखी कमी होऊ शकतात.

बेस मेटल: चीनची अर्थव्यवस्था विस्तारत असल्याने एलएमईवरील बेस मेटलचे दर हिरव्या रंगात स्थिरावले. अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्याने या दरांना आधार मिळाला. चीनचा जीडीपी दुसऱ्या तिमाहीत जुलै २०२० पासून सप्टेंबर २०२० पर्यंत ४.९% नी वाढला. यामुळे औद्योगिक धातूंची मागणी आणखी वाढली. सप्टेंबर २०२० मध्ये चीनमधील प्रायमरी अॅल्युमिनिअमचे उत्पन्न ७.९% नी वाढले. ते ३.१६ दशलक्ष टनांवर पोहोचले. चीनमध्ये नवे स्मेल्टर्स सुरू झाल्याने उत्पादनात आणखी वाढ झाली. स्टेनलेस स्टील सेगमेंटकडून मागणी वाढत असल्याने निकेलने एलएमई आणि एमसीएक्सवर अनुक्रमे १% आणि ३% नी वाढ घेतली.