Breaking News

आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला - एकनाथ खडसे




मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपाला रामराम  ठोकला आहे. शुक्रवारी ते राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.  राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. 


खडसे म्हणाले की, भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असं ते म्हणाले.


 माझा निर्णय मी घेतला आहे. जनता माझ्यासोबत आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेनेने एकदाही राजीनाम्याची मागणी केली नाही. मी स्वयंस्फूर्तीने राजीनामा देतोय. मी देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर खोटा विनयभंगाचा खटला दाखल केला. हे सर्वात त्रासदायक होतं, असं ते म्हणाले. मी आजवर जे मिळवलं ते माझ्या ताकतीने मिळवलं. भाजपमध्ये कुणाच्या उपकारानं पदं मिळवली नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर एकही आरोप झालेला नव्हता. मात्र त्यांनी माझं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मला तोंडावर एक बोलायचं आणि मागून माझ्याविषयी वेगळं षडयंत्र केलं गेलं, असंही खडसे म्हणाले. आज यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला उद्या हे बलात्काराचा गुन्हा दाखल करतील, असं ते म्हणाले.



मला भाजपमध्ये थांबवण्यासाठी किंवा चर्चेसाठी चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कुणीही फोन केला नाही, असंही ते म्हणाले.  मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटणारा देखील नाही, असंही खडसे म्हणाले. रक्षाताईं खडसे भाजप सोडणार नाहीत, त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, असंही ते म्हणाले. रोहिणी खडसे देखील जिल्हा बॅंकेवर राहतील, असंही ते म्हणाले. मी कुठल्याही आश्वासनावर राष्ट्रवादीत जात नाहीये, असंही ते म्हणाले. मी पदासाठी जात नाहीये, पद मी इथंही मिळवलं असतं, असंही ते म्हणाले.


खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार - जयंत पाटील 


गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्तांवर शिक्कामोर्तब केलं. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली.


“भाजपाची खऱ्या अर्थानं वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचं मला सांगितलं. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे,” असं पाटील यांनी सांगितलं.