पुण्यात शिवाजीनगर न्यायालय परिसरातून अपहरण झालेल्या वकिलाचा खून
तीन आरोपीना अटक, आरोपीमध्ये एका वकिलाचा समावेश
पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या वकिलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेश मोरे असे खून झालेल्या वकीलाचं नाव आहे. या प्रकरणी कपिल विलास फलके (वय ३४ चिखली) दीपक शिवाजी वांडेकर (वय २८ बीड) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२ मार्केट यार्ड पुणे) या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यातील अपहृत वकिलाच्या शीघ्र तपासासाठी पोलिस आयुक्तांना निवेदन
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून 1 ऑक्टोबरला उमेश मोरे हे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी उमेश यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकांची नेमणूक केली होती. त्यानंतर या पथकाकडून उमेश यांच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे त्यांच्याबाबत विचारपूस करण्यात आली. तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटिव्हीचे फुटेजही तपासण्यात आले. मात्र उमेश यांचा काहीही पत्ता लागला नाही.यानंतर पुण्यातील घाट परिसरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह उमेश मोरे यांचा असल्याचं निष्पन्न झालं.
यानंतर पोलिसांनी माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे. कपिल फलके, दीपक वांडेकर, रोहित शेंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्यावर्षी एसीबीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात केलेल्या करवाईमध्ये उमेश मोरे फिर्यादी होते. त्यामुळे या खुनाचा त्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून १ ऑक्टोबर रोजी उमेश चंद्रकांत मोरे हे बेपत्ता झाले. ते घरी आले नसल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार उमेश यांचा शोध घेण्यासाठी तीन पथकांची नेमणूक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर उमेश यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे चौकशी केली. शिवाजीनगर परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले.
उमेश यांचा शोध सुरू असताना. आमच्या बातमीदारा मार्फत ताम्हीणी घाटात त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. तेथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला असून या प्रकरणी कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर आणि रोहित दत्तात्रय शेंडे या तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या खून प्रकरणी कबुली दिली आहे. त्या तिघांकडे अधिक चौकशी केली असता जमिनीच्या वादातून खून केल्याचे सांगितले असून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.