Breaking News

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची त्वरित नियुक्ती करा - भाजप




मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची त्वरित नियुक्ती करावी, राज्यात दिशा कायदा अंमलात आणावा, महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांचा जलद निपटारा होण्यासाठी जलदगती न्यायालयांची संख्या वाढवावी तसेच कौटुंबिक हिंसाचाराचे खटले  लवकरात लवकर निकालात काढावेत अशा मागण्या  भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.  


महाराष्ट्रात महिला अत्याचार घटनांचे प्रमाण वाढले असून कोरोना विलगीकरण केंद्रातील महिला रूग्ण ही सुरक्षित नाहीत. यासंदर्भात राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षे संबंधित राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मुंबई येथे सोमवारी पिडीत महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी काही सामजिक संस्थांनाही भेटी दिल्या. महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने रेखा शर्मा यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 


राज्यात गेल्या सात - आठ महिन्यापासून एकामागोमाग एक अशा धक्कादायक महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोरोना विलगीकरण केंद्रातलही महिला रूग्ण सुरक्षीत राहिलेल्या नाहीत. विविध ठिकाणाच्या घटना माध्यमाच्या मार्फेत समोर येत असतानाही राज्य सरकार मात्र महिला सुरक्षेसाठी ठोस पाऊल उचलत नाही. यासाठी भाजपाकडून आंदोलनासह अनेक निवेदनेही राज्य सरकारला दिले मात्र राज्य सरकारने अजुनही हालचाल केलेली नाहीये. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती नसल्यामुळे राज्यात चार हजार पेक्षा जास्त तक्रारी प्रलंबित आहेत, अशा बाबी शिष्टमंडळाने रेखा शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिल्या.   


यावेळी सरचिटणीस अश्विनी जिचकर सविता कुलकर्णी, उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, माधुरी अदवंत, ज्योती जाधव, रिधा रशीद, चिटणीस एड. वर्षा डहाळे, रोहिणी नायडू, कोषाध्यक्ष शैला मोळक, कार्यालय मंत्री शिल्पा गणपत्ये आदी उपस्थित होत्या.