गुड न्यूज : पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली , 4 कोविड केअर सेंटर बंद
पुणे - कोरोनाच्या संदर्भात पुण्याची गुड न्यूज आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटू लागली आहे. तसेच कोरोना झाला तरी अनेकजण होम क्वारंटाइन होत असल्याने रुग्णालयावरील ताण कमी झाला आहे. त्यामुळेच पुणे महापालिकेने चार कोविड केअर सेंटर आणि नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरात महापालिकेच्या वतीने 11 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगीकरण कक्ष चालवले जातात. आता 11 पैकी 4 कोविड केअर सेंटर आणि 16 विलगीकरण कक्षापैकी 9 कक्ष बंद केले जाणार आहेत. त्यामुळे शहरात सध्या प्रत्येकी 7 कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष सुरु राहतील.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्येत घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयातील काही बेड रिकामे आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर चालवण्याचा खर्च, मनुष्यबळाचे व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा विचार करुन महापालिकेने चार कोविड केअर सेंटर आणि नऊ विलगीकरण कक्ष तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 1 लाख 54 हजार 581 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 38 हजार 452 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या 12 हजार 285 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यापैकी 856 जणांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामधील 456 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
दरम्यान पुण्यात 20 ठिकाणी कोविड केअर सेंटर प्रस्तावित आहेत. तर शिवाजीनगर आणि बाणेर येथे जम्बो कोविड रुग्णालयंही उभारण्यात आली आहेत.