Breaking News

राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू


मुंबई - राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सुधारित वेतनश्रेणी 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू होईल.


राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचा-यांना पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांची वेतनश्रेणी अचूक आहे तसेच ज्या पदांची पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी योग्य आहे, मात्र सहाव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेत सदर वेतनश्रेणीत बदल होऊन त्यानुसार सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी सुधारित झालेली आहे, अशा पदांना पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी आधारभूत मानून त्यानुसार समकक्ष सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी अनुज्ञेय करून त्याप्रमाणे समकक्ष सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्यात येईल.


राज्यातील 6 अकृषि मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर)  विद्यापीठात विद्यापीठ स्तरावर मुद्रणालये अस्तित्वात आहेत. या विद्यापीठ मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांची वेतन अदायगीचे दायित्व विद्यापीठ निधीतून देण्यात येते. तथापि अशा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेण्या शासन स्तरावरुन लागू करण्यात येतात. विद्यापीठ  मुद्रणालयातील पदांना पाचव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी आधारभूत मानून त्यानुसार समकक्ष वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी 1 जानेवारी 2006 पासून अनुज्ञेय करून त्याप्रमाणे समकक्ष सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी  1 नोव्हेंबर 2020 पासून लागू करण्यास  मान्यता देण्यात आली.यासाठी होणाऱ्या सुमारे रू.268.23 कोटी एवढ्या वाढीव वार्षिक आवर्ती एवढ्या खर्चास मंजूरी देण्यात आली.


शाळांना अनुदानामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना लाभ

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण २१६५ शाळांना २० टक्के  व ह्या याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या  २४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान १ नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ एकूण ४३ हजार ११२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.