Breaking News

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली - चंद्रकांतदादा पाटील



मुंबई - राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले असताना केवळ दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.


शेतकऱ्यांची घोर निराशा केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा भाजपा निषेध करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी स्वतः मागणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करून शब्द पाळावा, अशी पक्षाची मागणी असल्याचे  चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.


ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत जाहीर केली आहे. याचा अर्थ ही मदत प्रति एकर केवळ चार हजार रुपये आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाहीच. पण आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची सरकारने घोर निराशा केली आहे.


ते म्हणाले की, भाजपा महायुतीचे सरकार असताना सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर किंवा अशा आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट मदत दिली होती.


त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी यंदाप्रमाणेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असताना काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मर्यादित अधिकार असतानाही दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे पॅकेज त्रोटक असल्याचे सांगितले होते व हेक्टरी पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपये मदतीची मागणी केली होती. त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्या वेळच्या नुकसानीबद्दलचे आपले आश्वासन अद्याप पाळले नाही. उलट यंदा पुन्हा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर त्यावेळी जे त्यांना त्रोटक वाटले होते तेवढेच दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.


ते म्हणाले की, राज्यातील शेतकरी संकटात असताना महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन मदत करायला हवी. त्यासाठी कर्ज काढावे. हे सरकार सतत केंद्र सरकारकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या जबाबदारीतून पळ काढत आहे. महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची नसल्याने ते सतत सबबी सांगत असतात.