Breaking News

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना फसविणारी - डॉ. अनिल बोंडे

 



मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असताना हवालदिल शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर केले तरी त्यामधील कृषी पिके व घरे यासाठी 5500 कोटी रुपये दिले जाणार आहेत. जाहीर केलेल्या 9,776 कोटी रुपयांपैकी रस्ते पुलासाठी 2,635 कोटी रुपये, नगर विकाससाठी 300 कोटी,  महावितरण करीता 239 कोटी रुपये, जलसंपदा करीता 102 कोटी रुपये, ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा करीता 1000 कोटी रुपये व कृषी शेती व घरासाठी 5,500 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे म्हणजे शेतकऱ्यांना शेती पिकासाठी 5,500 कोटी रुपये अतिशय तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी टीका भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. 


मागील वर्षी तत्कालिन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 10,000 कोटी रुपयांची मदत फक्त शेतकऱ्यांना करीता दिलेली होती. त्यावेळी बांधावर गेलेल्या उद्धवजी ठाकरें यांनी कोरडवाहूला 25,000, बागायतीला 50,000 व फळबागांना 1 लाख रुपये देण्याची मागणी केली होती व शरदचंद्रजी पवार यांनी काटोल मध्ये हीच मागणी पुढे रेटली होती. परंतु आज मुख्यमंत्र्यांनी 10,000 रु. प्रति हेक्टर म्हणजे 4000 रु. प्रति एकर बागायती व जिरायती पिकाकरिता घोषित केले आहे. खरडून व वाहून गेलेल्या जमिनीचा उल्लेखही केला गेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टोल धारकांच्या नुकसानभरपाई साठी 125 कोटी रुपये तातडीने देऊ शकतात. कपिल सिब्बल सारख्या वकिलाला 10 लाख रुपये प्रत्येक सुनावणीसाठी देऊ शकतात परंतु त्यांनी शेतकऱ्यांची 4000 रु. वर बोळवण केली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना 3,800 रु. धनादेश देऊन शेतकऱ्यांच्या दयनेय अवस्थेची थट्टा केली त्याचीच पुनरावृत्ती ह्या मदतीने केली आहे. द्यायचे 5,500 कोटी रुपये व सांगायचे 10,000 कोटी रुपये ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्ज काढावे आणि कोरडवाहु ला 25,000 रुपये प्रति हेक्टर, बागायतीला 50,000 रुपये प्रति हेक्टर आणि फळबाग करिता 1 लाख रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत द्यावी व बोललेले वचन पूर्ण करावे. तुटपुंजी मदत करून बोळवण केल्यास शेतकरी माफ करणार नाही हे लक्षात ठेवावे, असेही डॉ. अनिल बोंडे म्हटले आहे.