महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक लागू होणार नाही - अजित पवार
पुणे - महाराष्ट्रात शेतकरी विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक लागू होणार नाही,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पवार म्हणाले की, 'आम्ही सध्या कायदेशीर अभ्यास करत आहोत, ही बिले घाईत मंजूर झाली आहेत. आम्ही राज्यात याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडूनही या बिलाचा विरोध केला जात आहे.'
या विधेयकाला शेतकरीविरोधी कायदा असे संबोधून शेतकरी संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अखिल भारतीय किसान सभेने पाठिंबा दर्शवला आहे. तर कोल्हापुरातही राजू शेट्टी यांनी बिलाची प्रत जाळली.शेतकरी कामगार पक्षानेही या विषेयकाला विरोध केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या विरोधाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसची दुपट्टी भूमिका असल्याचे सांगून, हा कायदा महाराष्ट्रात लागू करावाच लागेल, असे म्हटले आहे.