रविंद्र बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला
पुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.त्यामुळे बऱ्हाटेचा अटकेचा मार्ग पोलिसांना मोकळा झाला आहे.
पुणे शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि काही कोटी रुपयांची जागा नावावर करुण देण्याची मागणी केल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा) याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात निलंबीत पोलीस कर्मचारी शौलेश हरिभाऊ जगताप (रा.भवानी पेठ), पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (रा.प्रियदर्शन सोसा.सिंहगड रोड) आणि दीप्ती आहेर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. याबाबत सुधीर वसंत कर्नाटकी (64,रा.राजगड, पौड) यांनी फिर्याद दिली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी पुणे जिल्हा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर बऱ्हाटे याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयातही बऱ्हाटे याची घोर निराशा झाली आहे.
रविंद्र बऱ्हाटे याने जमा केलेल्या 2 हजार 760 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत.त्याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला, त्यामुळे रविंद्र बऱ्हाटे अडचणीत आला आहे.