Breaking News

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह पाच जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल



पुणे : बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडे जमीन व दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह पाच जणांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिघांना रात्री उशिरा अटक केली.


याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी (वय 64, पौड रस्ता, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून दीप्ती अनिल आहेर (रा. बावधन), रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा), शैलेश हरिभाऊ जगताप (रा. भवानी पेठ), अमोल सतीश चव्हाण (रा. चव्हाणवाडा, कोथरूड) व देवेंद्र फुलचंद जैन (रा. सिंहगड रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणे, संगनमत करून कट रचणे, धमकावणे असे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा आहेर, जगताप आणि जैन यांना अटक केली. कर्नाटकी यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची 2007 मध्ये आहेर हिच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्यांनी दोघांच्या नावावर बावधन येथे एक सदनिकाही खरेदी केली होती. त्यानंतर महिलेने मैत्रीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडे अवास्तव मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत तिने बऱ्हाटे, जगताप, जैन व चव्हाण या चौघांच्या मदतीने कर्नाटकी यांच्याकडे संयुक्त सदनिका व सहा लाखांची मागणी केली. या सदनिकेचा तिने करारनामाही करून घेतला.

याशिवाय आहेर हिने फिर्यादीला वारंवार फोन करून, प्रत्यक्ष भेटून व भररस्त्यात दुचाकी आडवी घालून धमकी दिली. त्यानंतर तिने या चौघांच्या मदतीने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची व जिवे मारण्याची धमकी देत, कर्नाटकी यांच्याकडे दोन कोटी रुपये व रास्ता पेठेतील जागा नावावर करून देण्याची मागणी केली. दरम्यान, जैन याने कर्नाटकी यांना त्याच्या कार्यालयात बोलावले. या प्रकरणाच्या बातम्या देऊन बदनामी करण्याची तसेच बऱ्हाटे व जगताप यांच्या ओळखीने गुन्हा दाखल करण्याची धमकी त्याने त्यांना दिली. तसेच आम्हाला दोन कोटी व रास्ता पेठेतील जमीन दे. त्या जमिनीवर पाय ठेवलास तर तुझा मुडदा पाडेल अशीही धमकी देण्यात आल्याचे कर्नाटकी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) किरण बालवडकर करत आहेत.


हिंजवडी पोलिसांत बलात्काराची तक्रार 
कर्नाटकी यांनी आरोपींच्या धमक्‍यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आहेर हिने अन्य आरोपींच्या मदतीने कट रचून त्यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कर्नाटकी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यावर त्यांनी फिर्याद दाखल केली.