वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत आले २१ हजार ७५३ प्रवासी
आणखी ३० विमानांनी येणार प्रवासी
मुंबई - . वंदेभारत अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १४१ विमानांनी २१ हजार ७५३ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत आणखी ३० विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.
आतापर्यंत आलेल्या एकूण २१ हजार ७५३ प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ७९२१ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ७५७२ आहे तर इतर राज्यांमधील प्रवाशांची संख्या ६२६० आहे.
या देशातून आले प्रवासी
आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हॉगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क या देशातून प्रवासी मुंबईत आले आहेत.
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.
वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.
...