कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा - मुख्यमंत्री
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करू यात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे
मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, 'कोरोना'मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही.
आता आपला सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. श्री गजाजन घरोघर येतात. पण लोकमान्य टिळकांनी त्यास सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन सामाजिक, राजकीय चळवळ निर्माण केली. मोठी जनजागृती त्यातून आजही होत असते.
मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले.
गणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्वाची आहे. माझे आपणास आवाहन आहे की, मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडप देखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील असे पहा. उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून हे सर्व ठरले आहे.
श्री गणरायांचे आगमन नेहमीच्या परंपरेनेच होईल व गणरायांचे आगमन महाराष्ट्राचे मांगल्य व संस्कारास बळ देईल. कोरोनाचे संकट तात्पुरते आहे. गणरायाच्या कृपेने या विघ्नाचेही विसर्जन होईल.
कोरोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा व लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द केली आहे. पण पालखीची परंपरा न मोडता हे केले. मुंबईतील 'गोविंदा उत्सव' म्हणजे दहीहंड्या रद्द केल्या. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आमदारांनी दहीहंडी उत्सवाचे १ कोटी रुपये कोरोना लढाईसाठी खर्च केले. महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याचा हा आदर्श व परंपरा सार्वजनिक गणेशोत्सवातही दिसेल.
महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच! ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहेच!