Breaking News

पुण्यातील खंडणी प्रकरणात बडे मासे गळाला लागणार ?

पुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या ७५ लाखाच्या खंडणी प्रकरणात एक पोलीस मित्र गजाआड झाल्यानंतर, आता पोलीस दल आणि मीडियातील कोणते मासे गळाला लागणार ? याकडे लक्ष वेधले आहे. या संपूर्ण प्रकरणाची राज्याच्या गृह विभागाने दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

पुणे शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७५ लाख रुपये उकळणाऱ्या आरोपीकडून पोलीस मित्र म्हणून मिरवणारा जयेश कासट ( रा. नारायण पेठ ) याने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती.त्याला शनिवारी अटक झाल्यानंतर चौकशी मध्ये कोणकोणते पोलीस अधिकारी आणि पत्रकार गळाला लागणार ? याची चर्चा सुरु आहे.

खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोज अडसूळ उर्फ अत्रे सध्या फरार असून, न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जो अर्ज केला आहे, त्यात जयेश कासट ( रा. नारायण पेठ ) याने पाच लाख खंडणी उकळल्याचा आरोप केला होता. कासट याने प्रकरण मिटवण्यासाठी काही पोलीस अधिकारी आणि पत्रकाराना पैसे वाटप करणार असल्याचे सांगितले होते, असेही नमूद केले होते.अडसूळ याने यापूर्वी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात पोलीस मित्र जयेश कासट  तसेच एक अप्पर पोलीस आयुक्त, एक महिला पोलीस उपायुक्त, एक वरिष्ठ पत्रकार, महाराष्ट्राच्या मानबिंदूतील एक पत्रकार पैसे वाटून घेणार असल्याचा उल्लेख केला होता. आता कासट गजाआड झाल्यानंतर बाकी लोकांवर कारवाई होणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

पोलीस मित्र जयेश कासट हा पोलिसांच्या  विघ्नहर्ता न्यासचा विश्वस्त आहे. त्याने पोलिसांसाठी विविध उपक्रम राबवून बड्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर संबंध प्रस्तापित केले होते. त्याचे अनेक पत्रकाराबरोबरही  सलोख्याचे संबंध  असून, एक प्रकारची दलाली सुरु होती. या खंडणी प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि पत्रकार गुंतले असून, त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

पोलीस मित्र जयेश कासट याच्या बँक खात्यावरून आजपर्यंत कोणकोणत्या पत्रकारास पैसे ट्रान्सफर झाले तसेच त्याने पेटीएम, फोन पे, गुगल पे वरून कोणत्या पत्रकाराला पैसे पाठवले याची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.