Breaking News

पुण्यात भाजप नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी (पुणे) : अंगावर फॉर्च्युनर गाडी घालून भाजप नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच नगरसेविकेचा विनयभंगही केला. ही घटना शुक्रवारी दुपारी निगडीतील भक्तीशक्ती चौक येथे घडली.

फॉर्च्युनर गाडी एमएच-14-जीएस-909 वरील चालक आणि अशोक काळे (वय 57, रा. ऐश्वर्या बंगला, कृष्णानगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 47 वर्षीय नगरसेविकेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर नगरसेविका आणि त्यांचे पती आपल्या मुलीला भेटण्यासाठी प्राधिकरणात गेले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते भक्तिशक्ती चौक येथून जात असताना आरोपींनी फॉर्च्युनर गाडी नगरसेविकेच्या मोटारीला आडवी लावली. त्यानंतर आरोपी मोटारचालक याने महिला नगरसेविकेचा विनयभंग केला. 'तुने मेरे मालिक के खिलाफ क्यों पोलिस मे तक्रार किया' असे म्हणून नगरसेविकेच्या कानाखाली मारली. तर मोटारीत बसलेल्या आरोपी काळे याने 'गाडी डाल उसके ऊपर' असे म्हणत आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील गाडी नगरसेविकेच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी काळे याने गाडीत बसून अश्लिल हातवारे करीत विनयभंग केला. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. घाडगे याबाबत अधिक तपास करीत आहेत.