मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवारला निधी टंचाईचा मोठा फटका
उस्मानाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवारला निधी टंचाईचा मोठा फटका बसला असून लघु पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत असलेली कामे राज्याच्या घसरत्या आर्थिक परिस्थितीमुळे थांबवण्याचे आदेश देण्यात आली आहेत.
राज्यातील जलयुक्त शिवार कामाच्या प्रगतीचा ३१ जानेवारीला विभागाच्या सचिवांनी आढावा घेतला. त्या बैठकीमध्ये ज्या कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे परंतु काम सुरू झालेली नाहीत अशी सर्व कामे थांबवण्याचे आदेश देण्यात आली आहेत. सध्या विभागाकडे निधी नसल्यामुळे येथून पुढे लघु पाटबंधारे विभागाकडून नवीन कामे घेऊ नयेत असेही आदेश देण्यात आले आहेत. ही अवस्था जर मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या प्रकल्पाची असेल तर राज्यातील आरोग्य, ग्रामीण, रस्ते, वीज उभारणी यांची काय अवस्था असेल असा प्रश्न पडला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी भाजप- शिवसेना सरकार सत्तेत आल्यानंतर, जलयुक्त शिवार हा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी टंचाई सदृश्य जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले. दोनच वर्षात त्याचा सकारात्मक निकाल दिसून आला. अनेक दुष्काळी गावात पाणी वाहू लागले. पण आता निधीअभावी बहुतांशी ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान बंद करावे लागत आहे.