Breaking News

अवैध धंदेवाल्यांकडून 'वसुली'; सहकारनगर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित

पोलिस आयुक्तांच्या मोहिमेला हरताळ; 'व्हिडिओ' व्हायरल झाल्यानंतर कारवाई

पुणे : शहर पोलिस दलात एकीकडे अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे चक्क पोलिसांकडूनच अशा धंद्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अवैध धंदेवाल्याकडून चक्क पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहकारनगर पोलिस ठाण्यातील दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी) कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये एका अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेतानाचा या दोन कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या गंभीर प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून तातडीने दखल घेत चौकशी करण्यात आली. कर्तव्यावर असताना अवैध धंदे चालविणाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क ठेवणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि सार्वजनिक ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण करणे हे गैरवर्तन असल्याचे या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.

या गंभीर गैरवर्तणुकीमुळे आणि पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या बेशिस्तीमुळे मुंबई पोलिस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१-अ) (१) (ब) आणि मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील नियम २५ च्या तरतुदींनुसार उपायुक्त मोहिते यांनी खुटवड आणि पवार या दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले आहे.

वरिष्ठांपर्यंत 'वाटा' जातो का?

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या अवैध धंदेवाल्यांविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अनेकांवर हद्दपारीची कारवाई केली जात आहे. असे असतानाही, पोलिस कर्मचाऱ्यांकडूनच अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खुटवड आणि पवार यांनी कोणाच्या वरदहस्ताने ही 'वसुली' केली आणि हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होत आहे. विशेष म्हणजे, या बेकायदा वसुलीतील पैशांचे वाटप तपास पथक प्रमुख, पोलिस निरीक्षक किंवा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांपर्यंत झाले होते का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा सध्या पोलिस वर्तुळात रंगली आहे.