जेव्हा भाजप सरकार येते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते, परंतु शरद पवारांच्या सत्तेत ते गायब होते
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा जोरदार हल्लाबोल
पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल करत, त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. "विरोधक आमच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, पण भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार आहेत," असे शहा यांनी म्हटले. पुण्यात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शहा यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही तीव्र टीका केली. "फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडा बहुत विजय मिळवला, पण विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहा यांनी दावा केला की, २०२४ मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने भाजपच्या नेतृत्वात बनेल. "कमळ पुन्हा फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे," असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींवर टीका
शहा यांनी राहुल गांधींच्या अहंकारावरही टीका केली. "२०१४ ते २०२४ या काळातील तीन निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. परंतु, राहुल गांधी यांच्यात अहंकार आला आहे," असे शहा म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शहा म्हणाले, "स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत."
मराठा आरक्षणाचा मुद्दा
शहा यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत, "जेव्हा भाजप सरकार येते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळते, परंतु शरद पवारांच्या सत्तेत ते गायब होते," असे शहा म्हणाले.
शेतकऱ्यांचा मुद्दा
दूध पावडर आयातीच्या निर्णयावर टीका करत शहा म्हणाले, "आम्ही गेल्या दहा वर्षांत एक ग्रॅमही दूध पावडर आयात केलेली नाही, परंतु दूध पावडर आयातीचा निर्णय हा शरद पवारांचा आहे."