'माधव रसायन' करोनातील 'आयएल-६'ला रोखण्यात यशस्वी
पुणे : श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूरने संशोधित केलेले 'माधव रसायन' हे औषध कोरोनावर परिणामकारक ठरले आहे. कोरोनातील 'इंटरल्यूकेन-६' (आयएल-६) या घातक रासायनिक द्रव्याला निष्क्रिय करण्यासाठी औषधाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. दिल्ली येथे केलेल्या शास्त्रीय चाचण्यांनंतर हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रातील मुख्य चिकित्सक वैद्य समीर जमदग्नी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी या संशोधनाच्या टीममधील सदस्य वैद्य प्रसाद पांडकर, वैद्य शैलेश मालेकर, वैद्य गिरीश शिर्के, वैद्य सागर कवारे, वैद्य तुषार सौंदाणकर आदी उपस्थित होते.
श्री सद्गुरू रुकडीकर महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्री आनंदनाथजी सांगवडेकर यांच्या संकल्पनेतून वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना महामारीच्या काळात श्री विश्ववती आयुर्वेद संशोधन केंद्र कोल्हापूरतर्फे 'माधव रसायन' व 'रस माधव वटी' या औषधाचे संशोधन करण्यात आले. दोन्ही औषधे महाराष्ट्र व संपूर्ण देशात कोविडची तीव्रता कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून रुग्णांना वापरण्यात आली. तसेच कोरोना काळात कार्यरत हजारो शासकीय निमशासकीय व खासगी क्षेत्रातील कोरोनायोद्ध्यांना श्री सदगुरु रुकडीकर महाराज ट्रस्ट व श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रातर्फे या औषधाचे सेवाभावी वाटप करण्यात आले. याचबरोबर आरोग्यरक्षक क्लिनिक अंतर्गत नोंदणी केलेल्या ५०० हुन अधिक आयुर्वेदिक डॉक्टरांनी कोरोना सदृश व कोरोना रुग्णांवर याचा उपयोग केला. त्याच्या नोंदी ठेवत सकारात्मक परिणाम आढळून आले.
कोविडची तीव्रता, आयसीयू / व्हेंटिलेटरची गरज लागणे, फुफ्फुसे निकामी होणे व मृत्यदर या साऱ्यांचा इंटरल्युकीन-६ या घटकाशी असणारा थेट संबंध जगभरातील विभिन्न संशोधनातून सिद्ध झाला आहे. इंटरल्युकीन-६ ला वेळीच नियंत्रित केल्यास फुफ्फुसे व अन्य अवयव निकामी होण्याची शक्यता टळते व रुग्णाची स्थिती सुधारते. माधव रसायन हे औषध सर्दी, ताप, कोरडा खोकला, अंग दुखणे, चव जाणे, वास जाणे या लक्षणांमध्ये उपयुक्त ठरते. याशिवाय शास्त्रीय चाचण्यांमध्ये उपयुक्तता पडताळण्यासाठी हे औषध दिल्लीला पाठविण्यात आले होते. जामिया हमदर्द विद्यापीठातील फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजीचे सहायक प्राध्यापक डॉ. पांडा यांनी केलेल्या 'इन्व्हिट्रो' अभ्यासात 'इंटरल्यूकेन-६' या कोरोनामध्ये घातक ठरणाऱ्या शारीरिक रासायनिक घटकावर माधव रसायनची उपयुक्तता पडताळण्यात आली. 'आयएल-६' हे एक सायटोकाईनला उत्तेजना देणारे असून, कोरोना संसर्गामुळे ते रक्तात सोडले जाते. त्याचे प्रमाण माधव रसायन आटोक्यात ठेवून 'सायटोकाईन स्टॉर्म' तयार होण्यास प्रतिबंध करते.
श्री आनंदनाथजी सांगवडेकर म्हणाले, "आयुर्वेदिक उपचारांनी रुग्णांना फायदा झाल्याचे अनुभव आपण पाहत आहोत. त्याला प्रयोगशालेय व प्रत्यक्ष संशोधनाची जोड देत औषधांच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकणे ही काळाची गरज आहे." या अनुषंगाने 'माधव रसायन'च्या प्रत्यक्ष रुग्ण चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी करारपूर्वक सुरु आहेत. वरील प्रत्यक्ष रुग्णचाचण्यांपूर्वी आलेले सकारात्मक परिणाम हे शास्त्रीय कसोटीवर आयुर्वेद व माधव रसायन या औषधाला सिद्ध करणारे आहेत.
वैदय समीर जमदग्नी म्हणाले, "पूर्णतः आयुर्वेदीय सिद्धांतांना अनुसरून संशोधित केलेल्या या औषधांची उपयोगिता आधुनिक निकषांवरही सिद्ध होतेय, याचे वेगळे महत्व आहे. बायो टेररिझमच्या या युगात भविष्यकालीन आव्हानांसाठीही आयुर्वेद या आपल्या बलस्थानाचा उपयोग देशाला होणार आहे. आयुर्वेदाकडे समाजातील सर्वच घटकांनी सकारात्मक पाहणे देशाच्या हिताचे ठरेल. आयुर्वेद फक्त इम्युनिटीसाठी नसून, ते कोविडमध्ये औषध म्हणूनही उपयुक्त ठरले आहे. आधुनिक वैद्यकाच्या परिभाषेत 'माधव रसायन' सायटोकाईन प्रतिबंधात्मक परिणामांचे हे संशोधन पुढे येणे ही एक मोठी सकारात्मक गोष्ट आहे."
असा झाला 'माधव रसायन'चा वापर
आतापर्यंत विविध कोविड सेंटरमध्ये 'माधव रसायन'चा रुग्णांमध्ये वापर करण्यात आला. यामध्ये कल्याण-डोंबिवली (२५००), पंढरपूर (५००), वसई विरार (१०००), ठाणे (९००), धुळे (१०००) येथील कोविड सेंटरमधील, तसेच पुण्यातील तीन वेगवेगळ्या कोविड सेंटरमधील १५०० अशा एकूण ७४०० रुग्णांवर या अधिकृतपणे शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैद्यकीय देखरेखीखाली 'माधव रसायन' वापरण्यात आले. या औषधामुळे रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी वाढणे, कोरोनाची लक्षणे लवकर कमी होणे, गुंतागुंत होण्याचे प्रमाण कमी आढळले. जास्त धोका असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत सुधारणा चांगल्या प्रकारे झाल्याचे आढळले. आतापर्यंत २ लाख कोरोना योद्ध्यांना रस माधव वटीचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय, एकूण ३ लाख माधव रसायन व ८ लाख रस माधव वटीचे वैद्यकीय वितरण झाले