Breaking News

सोसायटयांनी बेकायदेशीररीत्या अडवला पालिकेने बांधलेला रस्ता !

 

८ दिवसात  रस्ता खुला झाला नाही तर आंदोलनाचा इशारा   



पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील विश्रामबाग  सोसायटी आणि लक्ष्मी  हाऊसिंग सोसायटी या  सोसायटयांनी पालिकेने बांधलेला रस्ता बेकायदेशीररीत्या अडवला असून तेथे गेट उभारून सोसायटी सदस्यांव्यतिरिक्त इतरांना जा-ये करण्यास मनाई करणारा फलक लावला  आहे !माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम यांनी या बेकायदेशीर प्रकारची दखल घेऊन महापालिकेकडे  तक्रार दाखल केली आहे. ८ दिवसात हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला झाला नाही तर  आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



 हे निवेदन जिल्हाधिकारी,पुणे पालिका आयुक्त,पोलीस आयुक्त,पथ विभाग,मुख्य अभियंता पथ विभाग,कार्यकारी अभियंता पथ विभाग यांना देण्यात आले आहे.  सेनापती बापट रस्त्यावरील विश्रामबाग  सोसायटी आणि लक्ष्मी  हाऊसिंग सोसायटी या दोन्ही सोसायट्यांमधून जाणारा रस्ता हा पालिकेच्या नकाशात डी पी रोड म्हणून दाखविलेला आहे.तरीही तेथे सोसायट्यानी  गेट उभारून अडविला आहे. जर हा खासगी रस्ता असता तर पालिकेने तो सिमेंट काँक्रीट करून दिला नसता. शिवाय या सोसायटयांनी त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे पालिकेच्या लाईट पोल वर लावले असून वायरिंग साठी पोलची मदत घेतली आहे. पालिकेच्या  पद पथावर वॉचमन साठी केबिन करण्यात आली आहे. तेथे गुंड प्रवृत्तीचे लोक बसविण्यात आले असून ते ये-जा करणाऱ्यांना दमदाटी करतात,अशी तक्रार  निवेदनात करण्यात आली आहे. 


पालिकेचा रस्ता बेकायदेशीररीत्या अडवून ये जा करणाऱ्यांना दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांबद्दल पालिकेने सोसायट्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निलेश प्रकाश निकम यांनी केली आहे. ८ दिवसात हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला झाला नाही तर  आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.