कोरोनाच्या विनाशाकरीता 'दगडूशेठ' गणपतीला सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचनातून साकडे
पुणे : कोरोनाच्या वैश्विक चे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता दगडूशेठ गणपतीसमोर संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचन करण्यात आले. तसेच ॠग्वेद, यर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांच्या संहिता पारायणासह महागणेश याग देखील पार पडला. सलग १५ दिवस चालणा-या या धार्मिक कार्यक्रमांमधून कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना देखील करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे ढुंडीराज तथा अधिक मासानिमित संकष्टी चतुर्थीला गणेशाला सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचनासह महागणेश याग करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी सुरु आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रआवर्तनात्मक गणेशयाग, विशेष अभिषेक राजोपचार व एकविंशती आवरण पूजन आणि सहस्त्रदुर्र्वाचन मंदिरात करण्यात आले. कोरोनाच्या जागतिक महामारीचे निवारण करण्याकरीता व जनकल्याणार्थ सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त होण्याकरीता आणि गणेश कृपा होण्याकरीता माता सिद्धी-बुद्धी यांच्याकडे संकल्प देखील करण्यात आला. तसेच नग्नभैरवाकडे सगळ्या दुष्ट शक्तींचा नायनाट करण्याकरीता आवाहन करण्यात आले. अधिक मासामध्ये केलेली प्रार्थना अधिकस्य अधिकम फलम या उक्तीप्रमाणे अधिक प्रमाणात गणरायापर्यंत पोहोचते, या श्रद्ध्ेने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
अनलॉकमध्ये मंदिरे तीन टप्प्यात उघडण्यात यावी
अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये विविध ठिकाणे, व्यवसाय देखील सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. मात्र, भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे अजूनही बंद आहेत. अनलॉकमध्ये जेव्हा मंदिरे सुरु करण्याची परवानगी दिली जाईल, तेव्हा ती तीन टप्प्यांमध्ये द्यावी. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात केवळ मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी परवानगी द्यावी. दुस-या टप्प्यात हार, फुले, नारळ यांची देवाण-घेवाण होईल, अशी व्यवस्था असावी आणि तिस-या टप्प्यात भाविकांना मंदिरात बसण्याची परवानगी असावी, अशा प्रकारे मंदिर उघडण्याची प्रक्रिया व्हावी. मंदिर उघडताना काय आचारसंहिता असावी, याची पुस्तिका तयार असून त्याप्रमाणे देवस्थाने यंत्रणा राबवितील. यामाध्यमातून कोरोनाला रोखता येईल व उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे व कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.
कोरोनाच्या विनाशाकरीता 'दगडूशेठ' गणपतीला सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचनातून साकडे https://www.punelive.today/2020/10/Pune-Dagdusheth-Ganpati-corona-Elimination-Prayer.html
Posted by Pune Live on Monday, October 5, 2020