साईबाबांच्या दर्शनाला गेलेल्या साधूसंतांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध
मुंबई - शिर्डीच्या साईबाबांकडे गाऱ्हाणे मांडण्यास गेलेल्या साधूसंतांना अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राज्यात मोगलाई अवतरल्याचे दाखवून दिले असून हिंदू भाविकांवर दादागिरी करणाऱ्या या कृतीचा आपण भारतीय जनता पार्टीतर्फे तीव्र निषेध करतो. हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खरे रूप या प्रसंगातून महाराष्ट्राला दिसले आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी सांगितले.
ते म्हणाले की, मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी मंगळवारी भाविकांनी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले. शिर्डी येथे साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून झालेल्या सत्याग्रहात आपण स्वतः सहभागी झालो होतो. लाक्षणिक उपोषणानंतर साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी साधू संत मंदिरात जाणार होते. त्यासाठी सकाळी दहा वाजताच शिर्डीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निर्णय झाला नसल्याने वाट पाहून सर्वजण अध्यात्मिक समन्वय आघाडीचे समन्वयक आचार्य तुषार भोसले यांच्यासह मंदिराच्या गेटपर्यंत गेले. तेथे त्यांना पोलिसांनी अडवले. दीडतास चर्चेचा घोळ चालू होता. अखेरीस शिर्डीचे संस्थानचे प्रमुख म्हणून मुख्याधिकारी बाहेर आले व त्यांनी साधू संतांना सांगितले की, आपले शासनाशी बोलणे झाले असून दर्शनाची परवानगी देऊ शकत नाही व हा निर्णय अंतिम आहे. यानंतर पोलिसांनी थेट साधूसंतांना अटक केली. निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, भाऊमहाराज फुरसुंगीकर, धर्माचार्य विभागप्रमुख, आचार्य जिनेंद्र जैन, सतपंथाचे रितेश पटेल यांच्यासह अन्य साधूसंत व किर्तनकार यांना अटक केली. साईबाबांच्या दर्शनासाठी शांततेने विनंती करणाऱ्या साधूसंतांना सरकारने परवानगी तर दिलीच नाही उलट त्यांना अटक केली. राज्यात मोगलाई अवतरल्याचेच हे लक्षण आहे.
त्यांनी सांगितले की, राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात साधू संतांवर हल्ले होण्याच्या निंदनीय घटना घडल्या आहेत. पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने साधूंना ठेचून मारले. नांदेडमध्ये ब्रह्मचारी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या करण्यात आली. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचे भूमीपूजन झाले म्हणून आनंद व्यक्त करणाऱ्या रामभक्तांवर ठाकरे सरकारने कारवाई केली. आता साईबाबांचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या साधूसंतांना अटक करून या सरकारने आपले खरे रंग दाखविले आहेत. भाजपातर्फे आपण राज्य सरकारचा निषेध करतो.