रविंद्र बऱ्हाटे याच्यावर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल
पुणे : पुणे शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे , पत्रकार देवेंद्र जैन यांच्यावर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रविंद्र बऱ्हाटे याचा पहिल्या खंडणी प्रकरणात न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर अजून शरण आलेला नाही. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सेनापती बापट रस्त्यावरील जागा मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करत धमकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत व्यवसायिक ऋषीकेश बारटक्के (वय 35) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार IPC कलम 420, 323, 506 (2), 386, 120 ब, 34, 2 व 25 गुन्हा दाखल केला आहे.बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेज जमादार, शैलेश जगताप यांचा पुतण्या जयेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन, आरटीआय कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे , अमित करपे आणि प्रकाश फाले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यात जयेश जितेंद्र जगताप (वय 30), परवेज शब्बीर जमादार (वय 35) आणि अमित विनायक करपे (वय 33) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जमीन-विक्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान यातील आरोपी यांनी फिर्यादी यांना सेनापती बापट रस्त्यावरील मोक्याची जागा विक्रीसाठी असल्याची माहिती त्यांना कॉमन मित्र कमलेश भाटी यांच्या मार्फत सांगितली. त्यामुळे फिर्यादी हे त्याचं दिवशी शैलेश जगताप यांना भेटण्यास गेले. त्यावेळी याठिकाणी यातील सर्व आरोपी बसले होते. शैलेश जगताप याने सर्वांची ओळख करून दिली. तसेच त्यांनी जागेचा वाद न्यायालयात सुरू असून, त्याचा 3 महिन्यात आमच्या बाजूने निकाल लागणार आहे. तसेच या जागेत सर्वांचा हक्क असून, ती जागा घेण्यासाठी आमच्या स्वाक्षऱ्या लागतील असे सांगत त्यांना जागा विक्रीबाबत माहिती दिली.
त्यानंतर आरोपींनी 2 कोटी देण्याचे आणि मूळ मालक फाले यांना अडीच कोटी देण्याचे सांगितले. फिर्यादींना तो व्यवहार मान्य झाला. यामुळे त्यांनी होकार दिला.त्यानंतर व्यवहार झाल्यानंतर 2 लाख 35 हजार रुपये फिर्यादी यांनी जमीनेचे मालक प्रकाश फाले यांना दिले. त्यानंतर चेकद्वारे, आरटीजीएस आणि ऑनलाइन असे 25 लाख रुपये, तर 40 लाखाची गाडी शैलेश जगताप याने देण्याची मागणी केली होती. त्यानुसार वाशीम येथील कंपनीत 50 हजार रुपये भरून दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर ही गाडी बुक केली. तर इतरांना 11 लाख रुपये दिले. असे वेगवेगळ्या स्वरूपात पैसे फिर्यादी यांनी दिले होते. मात्र या कालावधीत तीन महिने झाल्यानंतर या जमिनीचा निकाल लागला नाही. अनेकदिवस वाट पाहूनही या जागेचा निकाल लागला नाही. त्यामुळे फिर्यादी हे रास्ता पेठेतील शैलेश जगताप यांच्या जागेतील कार्यालयात जाऊन भेटले. तसेच हा व्यवहार नको, असे म्हणल्यानंतर आरोपींनी त्यांना धमकवण्यास सुरुवात केली. तसेच त्याठिकाणी मारहाण करत राहिलेले 1 कोटी 88 लाख रुपये देण्याची धमकी देऊन डोक्याला पिस्तुल लावुन आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत. दरम्यान, कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात यापूर्वीच शैलेश जगताप, देवेंद्र जैन यांना अटक करण्यात आलेली आहे.